भाजपाने काय छळ केला ते गुलाबरावांनी जाहीर करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2017 10:59 PM2017-01-27T22:59:16+5:302017-01-27T22:59:16+5:30
नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेची राज्यात चौथ्या क्रमांकापर्यंत पिछेहाट झाली आहे. हा पराभव जिव्हारी लागल्याने पैसा, जातीचे राजकारण असे आरोप भाजपावर करण्यात येत आहे
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 27 : नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेची राज्यात चौथ्या क्रमांकापर्यंत पिछेहाट झाली आहे. हा पराभव जिव्हारी लागल्याने पैसा, जातीचे राजकारण असे आरोप भाजपावर करण्यात येत आहे. भाजपाने शिवसेनेला काय छळले हे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर करावे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हा बँक, जिल्हा दूध संघात असलेल्या युतीबाबत सेनेनेच निर्णय घ्यावा, असे ही ते म्हणाले. यावेळी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील उपस्थित होते.
काय छळ केला ते गुलाबरावांनी सांगावे
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केला नाही तितका छळ भाजपाने केला असल्याचे म्हटले होते, याबाबत महाजन यांना विचारले असता ‘भाजपाने काय छळ केला ते त्यांनी सांगावे’ असे ते म्हणाले. पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पिछेहाट झाल्याने पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे त्यांच्याकडून आरोप होणे स्वाभाविक आहे.
जिल्हातंर्गत युतीचा निर्णय सेनेने घ्यावा
युती तोडल्यानंतर शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाबाबत विचारले असता हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. यावर भाष्य करण्या इतका मोठा नेता मी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये असलेली युती ही यापूर्वी झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात युती ठेवायची किंवा नाही याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील युती सध्या कायम
उद्धव ठाकरे यांनी यापुढे युती न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यात जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अनेक दिवसांपूर्वीची युती आहे. त्यामुळे जिल्हातंर्गत युतीमध्ये काही बदल होईल असे वाटत नाही.