“एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता, पण...”; कुणी केला मोठा दावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 22:40 IST2025-01-26T22:37:39+5:302025-01-26T22:40:47+5:30

Shiv Sena Shinde Group Gulabrao Patil News: सर्व आमदारांचा एकनाथ शिंदे यांनी मान ठेवला आणि उपमुख्यमंत्रीपद घेतले, असा मोठा खुलासा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

gulabrao patil big statement that eknath shinde was not ready to take deputy cm post in new mahayuti govt | “एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता, पण...”; कुणी केला मोठा दावा?

“एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता, पण...”; कुणी केला मोठा दावा?

Shiv Sena Shinde Group Gulabrao Patil News: २०२४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठे बहुमत मिळाले. भाजपा १३२ जागांसह सर्वांत मोठा पक्ष बनला, तर शिवेसना शिंदे गटाला ५७ जागा मिळाल्या, तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. यानंतर उपमुख्यमंत्रीपदासह मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्रीपदावरून महायुतीत चांगलेच मानापमान नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्रीपदावरून अद्यापही नाराजी नाट्याचा पुढील अंक सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, असा मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. 

महायुती सरकार स्थापन होऊन कारभार करण्यास सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग येऊन एकनाथ शिंदे चांगलेच नाराज असून, उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर आता त्यावेळेस सुरू असलेल्या चर्चा खऱ्याच होत्या, असे म्हटले जात आहे. 

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता, पण...

एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी नकार दिला होता, त्यावेळेस टीव्हीवर बातम्या  चालत होत्या. आम्ही त्यांना विनंती केली की, आपण सत्तेमध्ये असले पाहिजे. एकनाथ शिंदे या नावाने सध्याचे महायुती सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती. त्यामुळेच, तुम्ही सरकारमध्ये असले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे आपल्या काळात उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मोठे मन दाखवले होते. आपण आता यावेळेस मोठे मन दाखवले पाहिजे आणि उपमुख्यमंत्रीपद घेतले पाहिजे, अशी विनंती आपण एकनाथ शिंदेंना केली होती. आपल्या सर्व आमदारांचा एकनाथ शिंदे यांनी मान ठेवला, असा खुलासा गुलाबराव पाटील यांनी केला.  

दरम्यान, ज्या माणसाला पद द्यायचे असतात त्याला किती टेन्शन असते हे सर्वांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये पाणीपुरवठा आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये पाणीपुरवठा खाते माझ्याकड़े होते. आता, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही पाणीपुरवठा अशी संधी मिळणारा पहिला मंत्री असेन, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

 

Web Title: gulabrao patil big statement that eknath shinde was not ready to take deputy cm post in new mahayuti govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.