शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना जामीन मंजूर
By admin | Published: June 18, 2016 12:58 PM2016-06-18T12:58:48+5:302016-06-18T17:53:22+5:30
म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवत फसवणूक केल्याप्रकरणातील संशयित आरोपी गुलाबराव पाटीलांना जामीन मंजूर झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १८ - म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत सभासद हजर असल्याचे दाखवत नवीन कार्यकारिणी गठीत करून फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी शिवसेनेचे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला.
जिल्हा व उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आमदार गुलाबराव पाटील हे १६ जून रोजी जळगाव येथील न्या.एस.पी. देवरे यांच्यापुढे शरण आले. त्यानंतर त्यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत १७ रोजी संपल्याने पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर जामिनासाठी अर्ज केला असता त्रयस्थ अर्जदाराने त्यांच्या जामिनावर हरकत घेतली होती. न्यायालयाने १७ रोजी जामिनावर निर्णय दिला नव्हता, त्यामुळे गुलाबराव पाटील यांचा मुक्काम जिल्हा कारागृहात होता. १८ रोजी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
काय आहे प्रकरण?
१९९१ मध्ये म्हसावदच्या पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची स्थापना झाली होती. त्यानंतर २०१२ पर्यंत संस्थेचे ६ सभासद हे मयत झाले होते. असे असताना आमदार गुलाबराव पाटील यांनी २० एप्रिल २००८ रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी अजेंडा काढला. त्यानंतर ३० एप्रिल २००८ रोजी ही सभा घेण्यात आली. संस्थेचे सभासद महारू काशीनाथ बेलदार हे १८ आॅगस्ट १९९६ रोजी मयत झालेले असताना ते सभेला हजर असल्याचे दाखवण्यात आले. तसा उल्लेख प्रोसेडिंगमध्ये करून सभेत नवीन कार्यकारिणी गठीत केली होती. याप्रकरणी अर्जुन लटकन पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून २०१२ मध्ये औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुलाबराव पाटलांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.