गुमास्ता कामगारांचा संप चिघळला
By admin | Published: October 18, 2016 05:42 AM2016-10-18T05:42:38+5:302016-10-18T06:05:47+5:30
मुंबईतील कपडा बाजारातील गुमास्ता कामगारांनी पुकारलेला बेमुदत संप सोमवारी चिघळला आहे.
मुंबई : मुंबईतील कपडा बाजारातील गुमास्ता कामगारांनी पुकारलेला बेमुदत संप सोमवारी चिघळला आहे. व्यापारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने येथील गुमास्ता कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, म्हणून बेमुदत संप मंगळवारी सुरू राहील, अशी माहिती मुंबई गुमास्ता युनियनचे संपतराव चोरगे यांनी दिली.
चोरगे म्हणाले की, बोनस, ग्रॅज्युईटी, वेतनवाढ अशा विविध मागण्या कामगारांनी मालकांकडे केल्या आहेत. येथील कपड्याच्या पाच विविध बाजारांतील व्यापाऱ्यांच्या एकूण १३ संघटनांनी दुपारी बैठक बोलावली होती. मात्र त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. अद्याप मुंबई गुमास्ता युनियनला चर्चेसाठी बोलावलेले नाही. त्यामुळे मंगळवारी संप कायम राहील, असेही चोरगे यांनी सांगितले.
गुमास्ता कामगारांच्या अनुपस्थित काही दुकानदारांनी दुकाने उघडली होती. मात्र ग्राहकांना दाखवलेल्या कपड्यांच्या घड्या घालणे आणि ग्राहकाची मर्जी सांभाळणे एकट्याला शक्य नसल्याने काही दुकानदारांनी दुपारी दुकाने बंद केली. त्यात येथील माथाडी कामगारांनीही संपात उडी घेत गुमास्ता कामगारांना पाठिंबा दर्शवला. त्यामुळे बाजाराबाहेरून कपड्यांचे गठ्ठे उचलून आणणे व्यापाऱ्यांना कठीण झाले. (प्रतिनिधी)
>कामगारांचे शक्तीप्रदर्शन
गुमास्ता कामगारांनी संपाचा पवित्रा घेतल्यानंतरही सोमवारी बहुतेक व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. मात्र संतप्त कामगारांनी पाचही बाजारांच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने केली.
यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र सायंकाळपर्यंत घोषणा देत कामगारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.