गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 09:40 AM2024-05-09T09:40:00+5:302024-05-09T09:40:10+5:30
बँकेच्या सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्कीही संचालक मंडळावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सहकार खात्याने ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांचे एसटी बँकेवरील संचालकपद रद्द केले आहे. बँकेच्या सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्कीही संचालक मंडळावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या तक्रारीनुसार, सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सभा आयोजित केली होती. सभेपूर्वी सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आले नव्हते. वार्षिक सभा घेण्यापूर्वी सभासदांना १४ दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणे आवश्यक होते. अशा कुठल्याही सूचना संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या.
बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांमधून असावेत, अशा प्रकारचा ठराव त्यांनी बेकायदेशीररीत्या केला होता. या ठरावाला सहकार खात्याने नामंजूर केले आहे.
एसटी बाहेरच्या लोकांना बँकेचे सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आला आहे. या आणि अशा प्रकारच्या एकूण १३ बेकायदेशीर विषयांची तक्रार संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती. बेकायदेशीर कर्मचारी भरतीसही सहकार खात्याने स्थगिती दिली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदेशीररीत्या जे ठराव पास झाले होते; ते सर्व ठराव सहकार खात्याने स्थगित केले आहेत. निवडणुकीच्या आधी हा खोटा प्रचार सुरू असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.