तोफा धडाडणार
By Admin | Published: February 5, 2017 01:56 AM2017-02-05T01:56:09+5:302017-02-05T01:56:09+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी वेगाने सुरू झाली असून, आजच्या रविवारी राजकीय पक्षांच्या प्रचार-प्रसाराला आणखी वेग येणार आहे. विशेषत: मतदानाच्या
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी वेगाने सुरू झाली असून, आजच्या रविवारी राजकीय पक्षांच्या प्रचार-प्रसाराला आणखी वेग येणार आहे. विशेषत: मतदानाच्या तारेखपर्यंत दोनच रविवार उमेदवारांसमोर असल्याने, राजकीय पक्षांनी प्रचार-प्रसाराचे वेळापत्रक आखत, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी दंड थोपटले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या अनुक्रमे गिरगाव, मानखुर्द येथील सभांनी प्रचाराची सुरुवात केली असतानाच, आजच्या रविवारी मुंबई शहर आणि उपनगरातील पक्षीय उमेदवार आपल्या प्रचार-प्रसाराचा नारळ फोडणार आहेत. मुलुंड येथील १०४ मधील भाजपाचे उमेदवार प्रकाश गंगाधरे, राष्ट्रवादीचे चेंबूर येथील नीलेश भोसले, घाटकोपर येथील १३२ मधील काँग्रेसचे प्रवीण छेडा यांच्यासह शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव, स्नेहल आंबेकर या उमेदवारांसह वरळी, दादर, अंधेरी, दिंडोशीसह बोरीवली
आणि मालाड-दहिसर येथील शिवसेनेच्या उमेदवारांनी रविवारचा मुहूर्त साधत, जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावर जोर दिला आहे. पूर्व उपनगरातही छेडा, गंगाधरे यांच्यासह शहरात नाना आंबोलेंसह उर्वरित उमेदवारांनी रविवारचा मुहूर्त साधत मतदारांच्या गाठीभेटीचे नियोजन केले आहे.
भाजपाचे सर्व उमेदवार रविवारी दुपारी २ वाजता हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून, त्यानंतर होणाऱ्या मेळाव्यात पारदर्शी भष्टाचारमुक्त कारभाराची शपथ घेणार आहेत. याच मेळाव्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते भाजपाच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात येणार आहे. शिवसेनेनेही प्रचारास सुरुवात केली असून, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ भांडुप आणि मुलुंड येथे ९ वाजता उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार असून, ६ ते १८ फेब्रुवारीपर्यंत सेनेच्या चांदिवली, घाटकोपर, सायन, कांदिवली, चारकोप, अंधेरी, विलेपार्ले, वरळी, परळ, वडाळा, दादर, गोरेगाव, दिंडोशी, दहिसर, मागाठाणे
आणि बीकेसी येथे सभा होणार आहेत. (प्रतिनिधी)
७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार
- राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार-प्रसार करण्यावर जोर आहे. इमारतींसह चाळीमधील मतदारांच्या गाठीभेटी, रॅली, चौकसभा आणि कार्यालयांचे उद्घाटन, अशा व्यस्त वेळापत्रकांनी महापालिकेची निवडणूक रंगणार आहे.
- ७ फेब्रुवारी ही उमेदवारी मागे घेण्याची तारीख आहे. परिणामी, यादिवशी कोणता अपक्ष अथवा पक्षीय उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतो? याकडेही मुंबईकरांचे लक्ष असणार आहे. या दिवशी मुंबईच्या २२७ वॉर्डमधील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असून, निवडणुकीला आणखीच रंग चढणार आहे.