तोफांची सलामी

By Admin | Published: September 1, 2016 03:29 PM2016-09-01T15:29:05+5:302016-09-01T15:29:05+5:30

सन १५०० ते १७०० च्या काळात प्रत्येक किल्ल्यावर सरंक्षणाच्या दृष्टीने तोफा ठेवलेल्या असत. युद्धात या तोफांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे.

Gunfire salami | तोफांची सलामी

तोफांची सलामी

googlenewsNext

मयुरेश गोखले

नागपूर , दि. १ -  सन १५०० ते १७०० च्या काळात प्रत्येक किल्ल्यावर सरंक्षणाच्या दृष्टीने तोफा ठेवलेल्या असत.  युद्धात या तोफांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे तसेच काही चांगली बातमी मिळाली किंवा कोणी खूप मोठे कार्य केले तर त्याचा सन्मान म्हणून २१ तोफांची सलामी देत असत. मला काही थोर पुरुष सापडले आहेत जे २१ तोफांची सलामी घेण्यास पात्र आहेत.आपल्यालाही या थोर पुरुषांची मी ओळख करून देतो .तुम्हाला कधी ते भेटले तर त्यांचे अभिनंदन करायला विसरू नका.

पहिला थोर पुरुष म्हणजे आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून आपली बायको ,पोरं यांना गाडीपाशी उभं करून हे महाशय जवळच्या पानटपरीवर सिगरेट , गुटखा खायला जातात.लगेच परत न येता काही वेळ तिथेच देशउपयोगी चर्चा करतात.एक लाल पिचकारी जवळपास सोडून मग मर्दासारखे गाडीपाशी येऊन बायका पोरांना घेऊन निघतात.लहान वयात पोरांना उत्तम संस्कार देणाऱ्या व आपल्या बायकोचा नेहमी मान राखणाऱ्या या थोर पुरुषाच्या कर्तुत्वाला २१ तोफांची सलामी ! धडाम..!

दुसरा थोर पुरुष म्हणजे गर्दीच्या रस्त्यामध्ये पार्किंगची कुठलीही जागा नसताना सामान्य वाहतुकीला अडचण होईल अश्या ठिकाणी हा मनुष्य गाडी पार्क करतो व निघून जातो. अहो , ते व्हील जामर , चालान वैगरेला मध्यमवर्गीय घाबरतात.या शूर पुरुषाच्या गाडीच्या मागे ‘ अमक्या संघटनेचा अध्यक्ष वैगरे लिहिलेले असतेच. मग “ शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती “ या भावनेने सार्वजनिक ठिकाणी हे लोक असेच धाडस करतात.वेळ आली तर थोडी मारामारी पण करून घेतात. या शूर सरदाराला २१ तोफांची सलामी ! धडाम ....l

तिसरा थोर व्यक्ती म्हणजे ,त्याचे महत्कार्य त्याच्याच शब्दात सांगतो-    “ भाई कल रातको चार ‘ बम्पर ' खतम किये फिर घर जाके एक नीप मारी फिर भी अपुन पुरे होश मे थे , जरासा भी हिला नही मै | “
असा थोर देशभक्त जो हलाहल स्वतः पिऊन देशाचे रक्षण करतो त्याला २१ तोफांची सलामी ! धडाम ...l

चौथा थोर पुरुष जो दुचाकी चालवताना आपल्या पवित्र थुंकीचा छीडकाव तुमच्यावर करतो.गाडी चालवताना तुम्ही ‘ अखंड असावे सावधान ‘ म्हणून थुंकून थुंकून तो तुम्हाला सतत सावधान करीत असतो आणि अपघातापासून वाचवतो .अश्या थोर पुरुषाला २१ तोफांची सलामी ! धडाम....l

पाचवा थोर पुरुष म्हणजे आपली समाजकार्ये लोकांपर्यंत पोचावी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक , धार्मिक कार्यक्रमात तो मोठमोठ्या रॅली काढतो. आपले फोटो फ्लेक्स मध्ये लावतो. DJ चा पैसा स्वतः खर्च करतो . कार्यकर्त्याचा ‘ खाण्या पिण्याचा ‘ भार स्वतः उचलतो. अशी लोकोपयोगी कामे करणाऱ्या थोर व्यक्तीला २१ तोफांची सलामी ! धडाम ....l

असे आणखी बरेच ‘ थोर ‘ आहेत .तुम्हालाही काही आठवले असतील.अश्या सर्वांना २१ तोफांची सलामी ! धडाम......l

छत्रपती आज असते तर त्यांनी पण या थोर लोकांना २१ तोफांची सलामी दिली असती . फक्त फरक इतकाच कि या सर्व लोकांना सलामीच्या वेळेस तोफेच्या तोंडाबाजुला जबरदस्ती उभे केले असते. २१ वेळा तोफेचा आवाज इतक्या जवळून ऐकून चड्डी ओली झाली कि परत कधी असे वागायची हिम्मत नसती केली या ‘ थोर ‘ पुरुषांनी !

असो l बहुत काय लिहिणे , आपण सुज्ञ असा ।

 

Web Title: Gunfire salami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.