Maharashtra Politics: “शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करतायत”: गुणरत्न सदावर्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 03:28 PM2022-10-14T15:28:05+5:302022-10-14T15:29:12+5:30
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खोटी प्रतिज्ञापत्र दिली असतील, तर तातडीने अटकेची कारवाई करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली.
Maharashtra Politics: राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. विरोधक महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप तसेच शिंदे गट यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
गुणरत्न सदावर्ते आणि डॉ. जयश्री पाटील यांच्या हस्ते कष्टकरी जनसंघाचे उद्घाटन करण्यात आले.कष्टकरी जनसंघाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांच्या आगमनाची जय्यत तयारी केली होती. कार्यक्रमावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्र हे श्रमिकांच्या चळवळीसाठी कायम अग्रेसर राहिलेले राज्य आहे, असे सांगत राज्यात अशांतता पसरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सदावर्ते यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करतायत
महाराष्ट्राला अशांत करण्याचे काही प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत, त्यांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न सुरू केलेत की काय, असा प्रश्न माझ्या तसेच कष्टकरी जनसंघाच्या मनात उपस्थित होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरही असे प्रयत्न होत आहेत, असा दावा करताना असे प्रयत्न कुणी करत असतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी कष्टकरी जनसंघ करत असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
...तर उद्धव ठाकरेंना अटक करावी
साधी चोरी किंवा वाहन परवाना मिळवण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीचा वापर केल्यास केवळ दंडात्मक नाही, तर अटकेची कारवाई केली जाते. मग, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून जर खोटी वा बनावट प्रतिज्ञापत्र सादर केली जात असतील, तर तातडीने या सगळ्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी कष्टकरी जनसंघ करत आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"