Gunratna Sadavarte on Sharad Pawar: “राष्ट्रपती पदासाठी उंची लागते आणि बौद्धिक...”; गुणरत्न सदावर्तेंचा शरद पवारांवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 10:10 AM2022-06-17T10:10:27+5:302022-06-17T10:11:47+5:30
Gunratna Sadavarte on Sharad Pawar: शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार ते वयोवृद्ध झाले आहेत, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
अकोला: राज्यातील विधान परिषद निवडणुकीसह देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. यानंतर महाविकास आघाडी सतर्क झाली असून, विधान परिषदेच्या निवडणुकीत याचा वचपा काढण्यासाठी रणनीति आखली जात आहे. यातच देशभरातील विरोधकांच्या आघाडीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, शरद पवार यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसे होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावे त्यांच्याकडे कुठली उंची आहे, असा प्रश्न विचारत सदावर्ते यांनी शरद पवार यांना टोला लगावला. कारण राष्ट्रपती पदासाठी उंची लागते त्यामुळे त्यांनीच विचार करावा, या पदावर जायचे की नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
राष्ट्रपती पदासाठी उंची लागते
मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा होते. आयएएस होण्यासाठीही परीक्षा असते. मला वाटते की, वाजवण्यासाठी चर्चा ठीक आहे. परंतु राष्ट्रपतीपदासाठी उंची लागते. तसेच बौद्धिक पातळी आवश्यक आहे. शरद पवार यांना चर्चेतून वाजवले जात आहे, असा घणाघात गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर केला.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी विरोधकांची एक मोठी बैठक पार पडली. या बैठकीत १७ राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी होकार दिल्यास त्यांना विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले जाईल, असे बैठकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितले. परंतु शरद पवार यांनी या प्रस्तावाला नकार दिला. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून माझे नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. तथापि, मला सांगावेसे वाटते की मी माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला आहे, असे शरद पवार म्हणाले.