जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात, कोर्टाने राज्य सरकारला दिले महत्त्वपूर्ण आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 04:12 PM2024-01-24T16:12:08+5:302024-01-24T16:12:54+5:30
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना नोटिस बजावली असून, राज्य सरकारलाही महत्त्वाचे आदेश दिले आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक आंदोलनाला सुरुवात केली आहे. अंतरवाली सराटी येथून लाखो मराठा आंदोलकांसोबत निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पुण्यात पोहोचला असून, ते २६ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना नोटिस बजावली असून, राज्य सरकारलाही महत्त्वाचे आदेश दिले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर योग्य ती कारवाई करण्यास तयार आहे, अशी हमी महाधिवक्त्यांनी राज्य सरकारकडून हायकोर्टाला देण्यात आली आहे. तसेत आता या प्रकरणावर दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतचे हजारो मराठा आंदोलक हे आज पुण्यामध्ये दाखल झाले आहे. आता ते आज रात्रीचा मुक्काम लोणावळा येथे करणार असून, तेथून ते उद्या दुपारपर्यंत पनवेल येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर हे आंदोलक २६ जानेवारी रोजी मुंबईत पोहोचतील. तसेच मुंबई मध्ये जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू होणार आहे.