Gunratna Sadavarte, Jayashree Patil: गुणरत्न सदावर्तेंविरोधात शेजाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा; मारहाण, शिवीगाळ अन् बरेच काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:40 PM2022-04-18T22:40:51+5:302022-04-18T22:41:41+5:30
क्रिस्टल टॉवर सोसायटीच्या सदस्यांनी सदावर्तेंविरोधात गंभीर आरोप केले आहेत. या इमारतीत सदावर्तेंचा १६ व्या मजल्यावर फ्लॅट आहे.
एसटी संपावर कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे आणि शरद पवारांच्या घरावर हल्ला करण्याच्या कटातील आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रारी थांबण्याचे नाव घेत नाहीएत. राज्यभरातून तक्रारी दाखल होऊ लागल्यावर आता सदावर्तेंविरोधात त्यांच्याच सोसायटीचे त्रासलेले रहिवासी तक्रारी करू लागले आहेत. हे आरोप खूप गंभीर आहेत.
एसटी आंदोलन सुरु असताना कोरोनाकाळात १००-१५० लोक सारखे सदावर्तेंच्या घरी येजा करत होते. एका व्यक्तीने डॉक्टर असलेल्या महिलेसोबत अश्लील वर्तन केले. त्याची तक्रार करण्यास गेलेल्या या महिलेला आणि तिच्या आईसोबत जयश्री पाटलांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचसोबत पोलिसांत गेल्यावर तिला तुरुंगात टाकण्याची आणि खटले दाखल करण्याची धमकी देखील देण्यात आली होती, असा आरोप या महिला डॉक्टरने केला आहे. जयश्री पाटलांनी यावर आपली बाजू मांडलेली नाही.
सोसाटीच्या सदस्यांनी आमच्या सर्वांसोबत त्यांची भांडणे झाल्याचे म्हटले आहे. असा एकही सदस्य उरलेला नाही, असे ते म्हणाले. क्रिस्टल टॉवर सोसायटीच्या सदस्यांनी सदावर्तेंविरोधात गंभीर आरोप केले आहेत. या इमारतीत सदावर्तेंचा १६ व्या मजल्यावर फ्लॅट आहे. जाब विचारण्यास जाणाऱ्या शेजाऱ्यांना ते शिवीगाळ आणि गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देखील देण्यात येतात असे हे शेजारी म्हणाले.
सदावर्ते यांच्या चार कार आहेत, त्यांना एवढ्या कार पार्किंगची परवानगी नाही, तरी देखील ते कुठेही गाड्या पार्क करतात, असा आरोप करण्यात आला आहे. सदावर्तेंनी त्यांच्या फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे, पालिकेकडे तक्रार करूनही कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सोसायटीच्या टेरेसवर झोपण्यासाठी जागा वापरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीव्ही ९ कडे याबाबतचे व्हिडीओ, तक्रारी आहेत.