Gunratna Sadavarte, Jayashree Patil: साताऱ्यात सदावर्तेंना, मुंबईत जयश्री पाटलांना दिलासा; न्यायालयाचे पोलिसांना अटक न करण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 07:23 PM2022-04-18T19:23:51+5:302022-04-18T19:26:18+5:30
Jayashree Patil Arrest Court Order: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. सदावर्ते यांना सातारा न्यायालयानेन्यायालयीन कोठडी दिली आहे. तर जयश्री पाटलांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.
सिल्व्हर ओकवर हल्ला प्रकरणी आणि जयश्री पाटलांना मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात आला आहे. पाटील यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांना सातारा न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर सदावर्ते यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामिन अर्जावर मंगळवारी सुनावणी घेतली जाणार आहे. आता सदावर्तेंना सारखे सारखे न्यायालयात हजर व्हावे लागणार नाहीय, यामुळे त्यांना उद्या मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये हलविण्यात येईल, असे सदावर्तेंचे वकील श्याम प्रसाद बेगमपूरे यांनी सांगितले.
सदावर्तेंची दीड वर्षांनी चौकशी...
दीड वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अॅड. सदावर्तेना दि. १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा पोलिसांनी सदावर्तेंची पोलीस कोठडी मागितली होती. परंतू न्यायालयाने ही मागणी फेटाळली.