Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 05:55 PM2024-10-03T17:55:46+5:302024-10-03T17:57:30+5:30
Gunratna Sadavarte : वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: दिली आहे.
Gunratna Sadavarte : मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक यांनी तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. अशातच आपल्या आक्रमक बोलण्याच्या स्टाईलने कायमच चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: दिली आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. तसेच आगामी निवडणूकही आदित्य ठाकरे वरळीतून लढणार आहेत. अशातच आता गुणरत्न सदावर्ते यांनीही आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. तसेच, महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. आता आगामी निवडणुकीत सुद्धा वरळीतून आदित्य ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर मनसेकडून संदीप देशपांडे सुद्धा वरळीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, महायुतीत या मतदारसंघात शिवसेना लढणार का भाजप? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाची आगामी निवडणूक हाय व्होल्टेज होणार, हे मात्र निश्चित आहे.
गुणरत्न सदावर्ते हिंदी बिग बॉसमध्ये करणार एन्ट्री!
लवकरच बिग बॉस हिंदीच्या १८ व्या पर्वात सहभागी होणार असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः सांगितले आहे. ‘आगे आगे देखो होता है क्या…’, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे तर आम्ही काळजी करत नाही लोक आम्हाला घाबरतात. तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची लढाई आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांचे म्हणणे आहे. तसेच, हमारा नाम काफी है, म्हणत लोक आम्हाला घाबरतात आम्ही तर डंके की चोटपर बोलतो. म्हणून आम्ही कोणाची काळजी करत नाही तर लोक आमची काळजी करतात, असे ते म्हणाले.