कोल्हापुरात गुरुजींचा राडा !
By admin | Published: August 24, 2015 01:24 AM2015-08-24T01:24:30+5:302015-08-24T01:24:30+5:30
प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ व विरोधक यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. अर्वाच्च शिवीगाळ करण्याबरोबरच खुर्ची तसेच चप्पल
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ व विरोधक यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. अर्वाच्च शिवीगाळ करण्याबरोबरच खुर्ची तसेच चप्पल फेकाफेकीमुळे गुरुजींच्या सभेला आखाड्याचे स्वरूप आले होते. एका शिक्षकाला तर कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली़
शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ७६वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन भारते यांनी विषयपत्रिकेवरील पहिल्या विषयाचे वाचन सुरू केले. तर त्यांना रोखत मागील प्रोसिडिंगच्या सविस्तर वाचनाची मागणी विरोधकांनी केली, तर हा विषयच मंजूर करावा, असा आग्रह सत्तारूढ गटाने धरला. या गोंधळातच कुणीतरी खुर्ची फेकली आणि धुमश्चक्रीला सुरुवात झाली. कोण कोणाला मारते, हेच कळत नव्हते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांच्या समर्थकांना सभागृहातून बाहेर काढले.
मागील पाच सभांचा अनुभव पाहता यावेळेला बॅँकेने पोलीस बंदोबस्त मागविला नव्हता. यावेळी मात्र तब्बल दोन तास गोंधळ सुरू होता, तरीही पोलिसांना पाचारण केले नाही.
एका गटाचे समर्थक विटा व दगड घेऊनच व्यासपीठावर बसले होते. सोशल मीडियावर गुरुजींचा राडा पाहून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले आणि पुढील अनर्थ टळला.
आपण शिक्षक आहोत, याचे भान अनेक मंडळींना नाही. जाणीवपूर्वक गोंधळ करून शिक्षकपेशाला गालबोट लावण्याचा उद्योग विरोधकांनी केला आहे.
- राजमोहन पाटील, अध्यक्ष, शिक्षक बँक
सभेतील राड्यास सत्तारूढ गटाचा पळपुटेपणाच जबाबदार आहे. आम्ही लोकशाहीमार्गाने समांतर सभा घेणार होतो; पण तिथेही गावगुंडांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
- प्रसाद पाटील, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष व बॅँकेचे संचालक