गुरुजी, पोरांसोबत सेल्फी काढा !
By admin | Published: November 3, 2016 08:12 PM2016-11-03T20:12:48+5:302016-11-03T20:12:48+5:30
शाळेच्या पटावर असलेले सर्व विद्यार्थी दररोज उपस्थित राहतात का, याची माहिती आता शिक्षकांना दररोज वरिष्ठांना द्यावी लागणार आहे. त्यासाठी शिक्षकाला
Next
>ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 03 - शाळेच्या पटावर असलेले सर्व विद्यार्थी दररोज उपस्थित राहतात का, याची माहिती आता शिक्षकांना दररोज वरिष्ठांना द्यावी लागणार आहे. त्यासाठी शिक्षकाला विद्यार्थ्यांसोबत उभे राहून ‘सेल्फी’ काढावा लागणार आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून हा प्रकार प्रत्येक सोमवारी सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने गुरुवारी दिले.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अभियानाला आता चांगले यश येत असल्याचा दावा शासनाने केला आहे. काही जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शाळा प्रगत झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, या शाळेत सातत्याने गैरहजर राहणारे विद्यार्थी अभियानाच्या १०० टक्के यशाला मारक ठरत आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश आहेत. प्रगत झालेल्या शाळेतही प्रत्येक वर्गातील एक-दोन विद्यार्थी सतत अनुपस्थित राहत आहेत. ही बाब टाळण्यासाठी आता ‘सेल्फी’चा उतारा शोधण्यात आला आहे.
प्रामुख्याने रोजगारासाठी स्थलांतरित होणाºया कुटुंबातील विद्यार्थी, इतर राज्यातून स्थलांतरित होऊन आलेले विद्यार्थी आणि गावातीलच असूनही नियमित शाळेत न येणारी मुले या तीन प्रकारातील विद्यार्थ्यांवर यापुढे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्थलांतर करणाºया कुटुंबातील पालकांना मुलाला शाळेतच कायम ठेवण्याविषयी मार्गदर्शन करण्याचा पर्याय शिक्षकांपुढे आहे. स्थलांतर करणाºया विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड देण्याच्याही सूचना आहे. मात्र, पालकांचा नाईलाजच असल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी गावात हंगामी वसतिगृह उभारण्याचे आदेश शिक्षण विभागाने गुरुवारी दिले.
वर्गात एकही विद्यार्थी अनुपस्थित राहू नये, यासाठी शिक्षकांनी आपल्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांसोबत ‘सेल्फी’ काढायचा आहे. दहा-दहाचा विद्यार्थ्यांचा गट करून हा सेल्फी काढायचा आहे. फोटोमधील विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या आधार क्रमांकासह हा सेल्फी सरल प्रणालीमध्ये अपलोड करायचा आहे. त्यातून वर्गात सातत्याने कोणता विद्यार्थी गैरहजर राहतो, हे शोधण्यात येणार आहे.