मारहाणीच्या भीतीने मुलांना सोडून गुरुजींचा पोबारा
By admin | Published: January 7, 2015 11:21 PM2015-01-07T23:21:45+5:302015-01-07T23:23:22+5:30
साताऱ्यातील संस्थेच्या पाचगाव आश्रमशाळेतील प्रकार
कोल्हापूर : शाळेतील कर्मचाऱ्यांनाच दोषी ठरवीत जखमी सूरज पवारच्या नातेवाइकांनी थेट शाळेवरच हल्ला करीत शिक्षकांना मारहाण केली. या प्रकारामुळे काल, मंगळवारी रात्रीनंतर निवासी शिक्षकांनी संस्थेतूनच भीतीपोटी पोबारा केल्याने येथील सर्व विद्यार्थी हवालदिल झाले. या घाबरलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रूपेश पाटील यांनी घरी नेल्याने हे विद्यार्थी आज, बुधवारी शाळेस आले. मात्र, शिक्षकच हजर नसल्याने विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहत बसले होते.
सातारा येथील भारतीय भटके, विमुक्त, विकास व संशोधन संस्थेची पाचगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे शंभर विद्यार्थी आहेत. ३० डिसेंबरला शाळेतील वायर चोरल्याच्या आरोपावरून सूरज पवार याला अधीक्षक जाधव यांनी मारहाण केल्याच्या रागापोटी सूरजने मामाच्या उचगाव येथील घरी स्वत:वर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात सूरज गंभीर जखमी झाला. त्यामुळे चिडलेल्या नातेवाइकांनी मंगळवारी थेट शाळेवरच हल्ला चढवीत दिसेल त्या शिक्षकांना मारहाण केली.
या प्रकारामुळे त्या शिक्षकांनी मंगळवारी रात्रीपासून शंभर विद्यार्थ्यांना संस्थेतच सोडून पोबारा केला. या प्रकाराची माहिती शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रूपेश पाटील यांना समजताच त्यांनी आश्रमशाळेत धाव घेत रात्री शंभर मुलांना आपल्या घरी नेले. पुन्हा आज, बुधवारी सकाळी या मुलांना शाळेत आणून सोडले.
मुले शाळेत आल्यानंतर सकाळी नऊ वाजता सुरू होणारी शाळा शिक्षकच नसल्याने दुपारी बारा वाजले तरी सुरू झाली नाही. त्यामुळे पुन्हा पाटील यांनी सातारा येथून अतिरिक्त कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. या प्रकारामुळे मुलांमध्ये चिंतेचे वातावरण होते.
मुलांशी बोलल्यावर त्यांनी प्रथम सूरजच्या प्रकृतीची चौकशी केली. शिक्षक व अधीक्षक चांगले आहेत. चूक केल्यानंतर ते आम्हाला समजावून सांगतात. जास्त दंगा केला तर थोडे जास्त चिडतात, असे मुलांनी सांगितले.
बुधवारचे जेवण जरा उशिराच
संस्थेतील १०० मुलांना जेवण करून घालणाऱ्या मावशींपैकी एकच मावशी हजर असल्याने बुधवारी मुलांना दुपारचे जेवण थोडे उशिराच मिळाले. बुधवारी स्वयंपाक करणाऱ्या शुभांगी कदम या मावशींच्या मदतीला शाळेतील महिला शिपाई मंगल नागराळे या धावून आल्या.
त्यांनी या मुलांना चपाती करून घालण्यास मदत केली; तर संस्थेच्या सातारा कार्यालयातून आणखी दोन कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पाठविण्यात आले. तेही या ठिकाणी सकाळी हजर होण्यासाठी आले होते.
साताऱ्यातून दोन कर्मचारी पाठवले
ज्येष्ठ नेते शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. माजी आमदार लक्ष्मण माने हे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण आता संस्थेचा व्यवहार पाहत नसून संचालक समता माने यांच्याशी संपर्क साधावा, असे सुचविले. घडल्या प्रकाराबद्दल संस्थेची भूमिका जाणून घेण्यासाठी समता माने यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, शाळेत एकूण नऊ शिक्षक आहेत परंतु ते भीतीपोटी निघून गेले आहेत म्हणून संस्थेने साताऱ्यातून दोन कर्मचारी मुलांच्या देखभालीसाठी पाठविले आहेत. शाळेत पोलीस बंदोबस्त आहे. वातावरण निवळले की शाळा सुरळीत होईल. शिक्षकांनी लवकर हजर व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळेतील अधीक्षक व शाळेतील शिक्षकांना सूरज पवारच्या नातेवाइकांनी मारहाण केली. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेवर बंदोबस्त ठेवला आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत आहेत.
- दयानंद ढोमे, पोलीस निरीक्षक, करवीर
पोलीस ठाणे
संस्थेतील विद्यार्थी सूरज पवार हा रीतसर रजाचिठ्ठी देऊन घरी गेला होता. त्याला अधीक्षक व शिक्षकाने मारहाण केलेली नाही. त्यामुळे नातेवाइकांचे आरोप निखलास खोटे आहेत.
- तानाजी घोरपडे, प्रभारी मुख्याध्यापक
राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळा
काय प्रकार झाला आम्हाला माहीत नाही. सकाळी नऊ वाजता सुरू होणारी शाळा अद्यापही सुरू झाली नाही. यामुळे आम्हा दहावीच्या विद्यार्थ्यांना काळजी लागून राहिली आहे. यंदा आमचे दहावीचे वर्ष आहे. जे शाळेत शिकविले जाते, त्याच्याच आधारावर आम्ही शिकत आहोत. त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुुरू व्हावी.
- तृप्ती हेगडे, विद्यार्र्थिनी
आश्रमशाळेतील शिक्षकांना काल मारहाण झाल्याने शिक्षक संस्थेतील कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. त्यामुळे मुलांच्या काळजीपोटी मी गिरगाव येथील घरी शंभर मुलांना घेऊन गेलो. आज, या प्रकरणाबद्दल माझे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे.
- रूपेश पाटील, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, कोल्हापूर
‘तू पारधी समाजाचा आहेस. तुझ्याकडून हे शिकणे होणार नाही. तू असाच आहेस,’ असे वारंवार जाणीवपूर्वक येथील शिक्षक सूरजला बोलत होते. यातच त्याच्यावर वायर चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे सूरजने घरी आल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. याला तेथील अधीक्षक व शिक्षक जबाबदार आहेत.
-मारुती चव्हाण, सूरज पवारचे मामा