गुटखा, सुगंधित सुपारीवरील बंदीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 02:50 AM2018-07-22T02:50:29+5:302018-07-22T02:50:56+5:30
वाहतुकीवरदेखील घातले निर्बंध; ३५ टक्के नागरिक करतात तंबाखुचे सेवन
पुणे : गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सुपारीवरील बंदीची मुदत आणखी एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घेतला आहे. या निर्णयात वाहतुकीवर देखील बंदी घातल्याने, बंदी घातलेल्या पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांनादेखील जरब बसणार आहे.
राज्य सरकारने २०१२ मध्ये राज्यात गुटखाबंदी लागू केली. त्याच्या पुढच्याच वर्षी (२०१३) सुगंधित आणि स्वादिष्ट सुपारीवर देखील बंदीचा सरकारने निर्णय घेतला. एफडीएच्या अधिकारात दर वर्षी या पदार्थांवरील बंदीचा कालावधी वर्षभराने वाढविण्यात येत आहे.
या बंदीचा कालावधी संपल्याने शुक्रवारी (दि. २०) बंदी कालावधी वाढविल्याचा अध्यादेश सरकारने काढला. त्यामुळे गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट-सुगंधित तंबाखू, मिश्रणयुक्त तंबाखू, खर्रा, मावा अशा एकत्र अथवा वेगवेगळ्या पुडीत अथवा कोणत्याही स्वरूपात विकण्यास प्रतिबंध घातला आहे. या पदार्थांची निर्मिती, साठवण, वितरण, विक्री आणि वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. पूर्वीच्या आदेशात वाहतुकीवरील बंदीचा समावेश नव्हता. परिणामी, अनेकदा न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी उद्भवत होत्या. त्यामुळे वाहतुकीवरदेखील बंदी घालण्यात आली आहे. अवैधरीत्या प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक करणाºयांवर अधिक वचक बसेल.
घातक मॅग्नेशियम कार्बोनेटचे घटक : अनेक आजारांना निमंत्रण
गुटखा, पानमसाला, तंबाखू आणि सुपारीमुळे हायपर मॅग्नेशिया, हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, ल्युक्योप्ल्याकिया, अन्ननलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, प्रजननस्वास्थ्य, जठर, आतडे व श्वसनाचे आजार होतात. एफडीएमार्फत ११५३ नमुन्यांची चाचणी केली असता, त्यात घातक अशा मॅग्नेशियम कार्बोनेटचे घटक आढळून आले होते.
टाटा रुग्णालयासह विविध संस्थांनीदेखील गुटखा, पानमसाला आणि सुपारीच्या घातकतेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुटखा, तंबाखू आणि सुगंधित सुपारीवर बंदी घातली होती.
ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे आॅफ इंडिया यांनी २००९-२०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ३५ टक्के व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखू सेवन करीत असल्याचे आढळून आले होते.
राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेच्या अहवालात १६ कोटींपेक्षा अधिक लोक धूम्रविरहित तंबाखूचा वापर करतात, असे अध्यादेशात म्हटले आहे.