४० लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: March 7, 2017 01:27 AM2017-03-07T01:27:42+5:302017-03-07T01:27:55+5:30
नाशिक : राज्यात गुटखाबंदी असतानाही शहरात अनेक ठिकाणी गुटखा वितरित होत असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे ४० लाखांचा गुटखा जप्त केला आहे.
नाशिक : राज्यात गुटखाबंदी असतानाही शहरात अनेक ठिकाणी गुटखा वितरित होत असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे ४० लाखांचा गुटखा जप्त केला आहे. सदर कारवाई ही सर्वात मोठी मानली जात असून, यातून अवैध गुटखा विक्रीची माहिती समोर येण्यास मदत होणार आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त विजय वंजारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विभागाने नाशिकरोड येथील मालधक्का येथून गुटख्याने भरलेला ट्रक जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वंजारी यांना सकाळी माहिती मिळताच अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील, सहायक आयुक्त (अन्न) वाय. के. बेंडकोळे, अन्नसुरक्षा अधिकारी डी. के. सोनवणे आणि एस. डी. परेकर यांनी नाशिकरोड येथील मालधक्क्यावर सकाळी ६ वाजेपासूनच पाळत ठेवली होती. याठिकाणी एमएच ०४ पीजी ३६३८ क्रमांकाचा संशयास्पद ट्रक आला असता अधिकाऱ्यांनी ट्रकच्या चालकाकडे चौकशी केली असता त्याला नीट उत्तरे देता आली नाही. अधिकाऱ्यांनी ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये सुमारे १०० पोती गुटखा आणि सुगंधीत तंबाखू असल्याचे आढळून आले.
चालकाकडे अधिक चौकशी केली असता सदर माल हा लोहिया यांच्या कंपनीसाठी आणला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सुमारे ४० लाख ४३ हजाराचा गुटखा जप्त करीत संबंधित ट्रेडर्सची चौकशी केली. तसेच जप्त केलेला माल सील करण्यात आला असून, त्याचे काही नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. गुटखाबंदी असतानाही शहरात गुटखा येत असल्याची खबर सहआयुक्त वंजारी यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आल्यानंतर लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची कारवाई सुरू होती. (प्रतिनिधी)