बागायतदारांना वरदान केळीची जी-९
By admin | Published: August 25, 2016 03:07 AM2016-08-25T03:07:47+5:302016-08-25T03:07:47+5:30
केळी बागायती दिवसेंदिवस कमी होत असतांना जी-९ या टिश्यूकल्चर केळीची जात बागायतदारांना वरदान ठरणारी आहे.
वसई : वाढते औद्यागिकरण आणि रोगराईमुळे वसईच्या केळी बागायती दिवसेंदिवस कमी होत असतांना जी-९ या टिश्यूकल्चर केळीची जात बागायतदारांना वरदान ठरणारी आहे. शनिवार दि.२७ आॅगस्ट रोजी शनी मंदिर वाघोली, ट्रस्टच्यावतीने शेतकऱ्यांना जी-९ या टिश्यूकल्चर केळीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. भरघोस पीक आणि रोगराईमुक्त पीक अशी या जातीची वैशिष्ट्ये आहेत.
गेल्या काही वर्षात केळींवर आलेल्या रोगांमुळे शेतकरी तिच्या लागवडीकडे पाठ फिरवायला लागले आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना पुन्हा केळीच्या शेतीकडे वळविणे गरजेचे होते. त्यासाठी उपयुक्त ठरणारी जी-९ ही जात रोगराईपासून मुक्त व कमी उंचीची असून एक सारख्या वाढीमुळे जास्त उत्पादन देते. या केळीच्या झाडांची लागवड वसईतील वातावरणास पूरक आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर व उपमहापौर उमेश नाईक यांच्या हस्ते वसईतील शेतकऱ्यांना या रोपांचे वाटप होणार आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबनशेठ नाईक व मनपाचे नगरसेवक उपस्थित रहाणार आहेत.
प्रायोगिक तत्वावर सध्या जी-९ टिश्यू कल्चर केळींची ५००० रोपे शेतकऱ्यांना लागवडीसाठी मोफत वाटली जाणार आहेत. त्यांची लागवड कशी करावी, याबाबत मार्गदर्शनही यावेळी करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी १ लाख केळीची रोपे वाटण्यात आली होती. (प्रतिनिधी)
>सुकेळी हे एकेकाळी आपल्या वसईची ओळख
केळीच्या बागा आणि सुप्रसिद्ध सुकेळी हे एकेकाळी आपल्या वसईची ओळख होते. अनेक जातींच्या केळींची लागवड वसईकर शेतकरी वर्षानुवर्षे करीत आहेत. राजेळी, वेलची, आंबट वेलची, भूरकेळ, हिरव्या सालीची (बसराई/बसरी) केळी, बनकेळ, मूठेळी, तांबडी (तांबड्या सालीची) तसेच सध्या प्रचलीत असलेली हजारी केळींची लागवड वसईत माठ्या प्रमाणात होत असे. त्यापैकी मूठेळी ही केळीची जात आता वसईतून नामशेष झाली आहे. बनकेळ ही जातही आता दुर्मीळ होत चालली आहे.
केतकीच्या सपाट्यात म्हसकेळचा बळी
वसईतील या केळ्यांना मुंबई बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी होती. म्हसकेळ या जातीच्या केळी फार लोकप्रिय होत्या. पण काही वर्षांपूर्वी पर्णगुच्छ (केतकी) नावाचा रोग आल्यामुळे ही जात त्याला बळी पडली. वसईतील शेतकऱ्यांनी इतर जातीच्या केळी अजूनही टिकवून ठेवल्या आहेत. केळीच्या विविध उपयोगांमुळे केळीच्या झाडांना कल्पतरू म्हटलं जातं. परंतु सध्या केळीच उत्पादन घेण शेतकऱ्यांना जिकरीचं होऊन बसलेले असताना या नव्या जातींमुळे आता वसई तालुक्यातील केळी लागवड पुन्हा एकदा भरभराटीला येण्याची चिन्हे दिसत आहेत.