आज कार्तिक एकादशी; ६५ एकर परिसरात ‘ज्ञानोबा-तुकारामाचा’ गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 01:20 PM2019-11-08T13:20:26+5:302019-11-08T13:24:32+5:30
२२५ दिंड्या घेतात विसावा; पाणी, वीज, शौचालय, पोलीस संरक्षण आदी सुविधा उपलब्ध
सचिन कांबळे
पंढरपूर : भागवत धर्माच्या पताका डौलाने फडकावित, टाळ मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोष करीत राज्याच्या कानाकोपºयातून आलेल्या २२५ दिंड्या ६५ एकर क्षेत्रामध्ये विसावल्या आहेत़ ज्या दिंड्यांनी विसावा घेतला त्यांनी भजन सादर करीत ६५ एकरचा परिसर दुमदुमून सोडला.
६५ एकर क्षेत्रावरील ५०२ पैकी ४७० प्लॉटचे बुकिंग झाले असून, १ लाख भाविक याठिकाणी दाखल झाले आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी दिली. कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी बुधवारपर्यंत ४७० प्लॉटचे वाटप केले होते. एक प्लॉट एका दिंडीसाठी देण्यात येत असून त्या दिंडीमध्ये ५०० भाविकांचा सहभाग असणे गरजेचे आहे. त्याठिकाणी राहण्यासाठी आलेल्या भाविकांना प्रशासनाकडून लाईट, पाणी, गॅस, शौचालय आदींची सोय केली आहे.
६५ एकर परिसरात वारीनिमित्त राहण्याºया भाविकांना सोयी पुरवण्यासाठी नगरपरिषदेचे १२० कर्मचारी, महाराष्टÑ राज्य विद्युत विभागाचे २५ कर्मचारी, वैद्यकीय विभागाचे ४ डॉक्टर व ८ परिचारिका, महसूल विभागाच्या २५ कर्मचाºयांंची नेमणूक केल्याचेही किशोर बडवे यांनी सांगितले.
कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा शुक्रवारी आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून दिंड्या दाखल होऊ लागल्या होत्या़ गुरुवारी या परिसरातील ४७० प्लॉट बुक झाले होते़ तत्पूर्वी दिंड्यातील काही मंडळी पुढे येऊन आपापला प्लॉट बुक करून ताब्यात घेऊन मंडप मारण्याचे काम करीत होते़ ज्या दिंड्या दाखल होत्या त्यातील भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेऊन कीर्तनासाठी सज्ज झाले.
टाळ मृदंगाचा गजर करीत कीर्तन सुरू केले़ काही वारकरी भजनात दंग झाले तर काही ठिकाणी भारुड सादर करून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या दिंडीतील अन्य भाविकांना आलेला शिणवटा घालविण्याचे काम केले.
गुरुवारी सायंकाळपर्यंत ६५ एकर परिसरात जवळपास १ लाख १३ हजार भाविक दाखल झाले होते़ सव्वा लाख ते दीड लाख भाविक येतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला.
भाविकांसाठी सोयीसुविधा
- - कार्तिक वारी सोहळ्याला आलेल्या वारकºयांसाठी प्रशासनातर्फे ६५ एकर क्षेत्रांमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ यामध्ये पाणी, वीज, तात्पुरती फायबरची आणि कायमस्वरुपी स्वच्छतागृहे उभारले आहेत़ इतकेच नव्हे तर प्रत्येक स्वच्छतागृहासमोर पाण्याचे बॅरल भरून ठेवले आहेत़ शिवाय त्या ठिकाणी प्लास्टिकचे तांबे व लहान आकाराच्या बकेट ही ठेवल्या आहेत़ प्रत्येक स्वच्छतागृहाजवळ एका कर्मचाºयाची नियुक्ती केली आहे.
- - वारकºयांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे़ या ठिकाणी प्रशासनाने आपत्कालीन सुविधा केंद्रही सुरू केले आहे़ काही वारकºयांच्या अडचणी असल्यास महसूल आणि महावितरणचे कर्मचारी कायमस्वरुपी तेथे उपलब्ध आहेत़ दिंडीकºयांना अखंड वीजपुरवठा पुरवण्यासाठी वीज वितरण कंपनीने कर्मचाºयांचे पथक तयार केले आहे़ प्रशासनाने चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्यामुळे बीड येथील रामचंद्र काळभोरे, विठ्ठल मोरे यासह अन्य वारकºयांनी समाधान व्यक्त केले.
भाविकांनीही स्वच्छता राखावी
- प्रशासनाने भाविकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़ त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे़ सर्वात महत्त्वाचे म्हणजे शौचालयाची सोय केली आहे़ त्या ठिकाणी प्लास्टिक तांब्या, छोटी बादलीही आहे़ शिवाय पाण्याने बॅरेल भरून ठेवले आहेत़ त्यामुळे भाविकांनीही शौचविधी करून आल्यानंतर त्याच ठिकाणी दुसरे भाविक जाणार आहेत़ हे लक्षात ठेऊन भरपूर पाणी ओतावे़ पण तसे होताना दिसत नाही़ कृपया भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे हुबळीचे चन्नप्पा बुधय्या यांनी सांगितले़