लोकमत वुमेन समिटमध्ये दिग्गजांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2015 02:54 AM2015-11-18T02:54:01+5:302015-11-18T02:54:01+5:30

कर्तृत्वाच्या झळाळीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी लोकमत माध्यम समूहातर्फे कलर्स प्रस्तुत एइसीसीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या

Gymnasium in Lokmat Women Summit | लोकमत वुमेन समिटमध्ये दिग्गजांची मांदियाळी

लोकमत वुमेन समिटमध्ये दिग्गजांची मांदियाळी

googlenewsNext

पुणे : कर्तृत्वाच्या झळाळीने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी लोकमत माध्यम समूहातर्फे कलर्स प्रस्तुत एइसीसीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत वुमेन समिट’ या चळवळीचे पाचवे पर्व रविवारी (दि. २२) पुण्यात हॉटेल हयात रिजेन्सी येथे रंगणार आहे. या राष्ट्रीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या महिलांच्या शौर्याला सलाम करण्यात येणार आहे, तसेच महिला सक्षमीकरणाबाबत विविध विषयांवर विचारमंथनही केले जाणार आहे. या वेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी, प्रसिध्द लेखक चेतन भगत, राजस्थानातील सोडा गावच्या भारतातील पहिल्या उच्चशिक्षित सरपंच छवी राजावत व महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे अशा दिग्गजांची मांदियाळी परिषदेचे भूषण ठरणार आहे. याशिवाय देशातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिला संवाद साधणार आहे. (प्रतिनिधी)

शबाना आझमी : पुण्यातील एफटीआयआयच्या माजी विद्यार्थी असलेल्या शबाना आझमी यांनी चित्रपटसृष्टीत ४० वर्षे पूर्ण केली आहेत. शाम बेनेगल यांच्या‘अंकुर’या चित्रपटातून १९७४ साली शबाना आझमी यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरूवात केली. त्यांनी १२० हून अधिक हिंदी, बंगाली तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधूनही भूमिका साकारल्या आहेत. पद्भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. लक्षवेधी भुमिकांसाठी आझमी यांना पाच वेळा उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चार फिल्मफेअर पुरस्कारांच्याही त्या मानकरी ठरल्या आहेत. भारतीय समाज, रुढी-परंपरा यांचे चित्रण करणा-या अनेक चित्रपटांनी समाजमनावर परिणाम साधला. स्त्रियांचे हक्क, अधिकार तसेच सामाजिक चळवळीत त्या नेहमीच सक्रिय असतात. त्या युनायटेड नेशन्सच्या पाप्युलेशन फंडच्या (यूएनपीएफए) च्या गूडविल अ‍ॅम्बेसिडर आहेत. एचआयव्ही बाधित रुग्णांसाठीही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

छवी राजावत : राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील सोडा या गावच्या सरपंच छवी राजावत या भारतातील पहिल्या उच्चशिक्षित सरपंच ठरल्या आहेत. राजावत यांनी बंगळूर येथील रिशी व्हॅली स्कूल आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम येथे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुण्यात व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम केले. मात्र, आजोबा रघुवीर सिंग यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांना गावाचा विकास करण्याची ओढ लागली होती. भारतातील खेड्याची ओळख आणि चित्र बदलण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या छवी यांनी वयाच्या २९ व्या वर्षी सोडा गावचे सरपंचपद स्वीकारले. भ्रष्टाचार, हिंसा, दुर्लक्ष, राजकारणातील वाईट प्रवृत्ती यांचा नाश करण्याच्या उद्देशाने त्यांनी विकासाचे अस्त्र हाती घेतले आहे. प्रशासनामध्ये पारदर्शकता येण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. गावात नागरी सुविधा निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. कृषी क्षेत्रात प्रगती व्हावी, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी त्यांनी कामाचा वसा हाती घेतला आहे. जयपूर येथील राजावत कुटुंबीयांचा असलेल्या हॉटेलचा कारभारही छवी पाहतात. घोडेस्वारीचे प्रशिक्षण देणारी त्यांची स्वत:ची शाळा आहे. अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या गरिबीसंदर्भातील जागतिक परिषदेत छवी सहभागी झाल्या होत्या.


चेतन भगत : फाइव्ह पॉइंट समवन, वन नाइट अ‍ॅट कॉल सेंटर, थ्री मिस्टेक्स आॅफ माय लाइफ, टू स्टेट्स, रिव्हॉल्युशन २०२०, व्हॉट यंग इंडिया वाँटस, हाफ गर्लफ्रेंड अशा बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक चेतन भगत हे तरुणाईची प्रेरणा आणि आवाज ठरले आहेत. पाचपैकी चार पुस्तकांवर आधारित चित्रपटांनी यशाचे शिखर गाठले. थ्री इडीयटस या त्यांच्या कादंबरीवरील चित्रपटाने आशय आणि विषयातून भारतीय शिक्षणपध्दतीवर प्रकाशझोत टाकला. टाईम्स मासिकाने चेतन भगत यांचे नाव ‘जगातील सर्वात परिणामकारक १०० व्यक्तींमध्ये समाविष्ट केले आहे. तरुणाईच्या भावविश्वावरील त्यांचे लेखन प्रेरणादायी आहे.

Web Title: Gymnasium in Lokmat Women Summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.