गतिमंद मुलाची ‘आधार’मुळे भेट
By admin | Published: July 10, 2017 04:29 AM2017-07-10T04:29:04+5:302017-07-10T04:29:04+5:30
तब्बल सहा वर्षांपूर्वी हरवलेला गतिमंद मुलगा आधार कार्डमुळे त्याच्या आई-वडिलांना भेटल्याची सुखद घटना येथे घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर (धुळे) : तब्बल सहा वर्षांपूर्वी हरवलेला गतिमंद मुलगा आधार कार्डमुळे त्याच्या आई-वडिलांना भेटल्याची सुखद घटना येथे घडली. नांदेड जिल्ह्यातील सुगाव येथील रवी हा नऊ वर्षांचा मुलगा आणि श्रीपती व सुमनबाई वैद्य या माता-पित्यांचे १ जुलै रोजी हे सुखद पुनर्मीलन झाले. शिरपूर येथील गतिमंद मुलांच्या बालगृह अधिकाऱ्यांनी रविवारी ही आनंददायी घटना जाहीर केली.
रवी शिरपूर येथील बालगृहात दाखल झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली. आधार नोंदणी सक्तीची असल्यामुळे त्याची नोंदणी करताना यापूर्वीच रवी श्रीपती वैद्य या नावाने त्याची नोंद असल्याचे आॅनलाइन दिसून आले. त्याच्या पूर्वीचा आधार क्रमांक उपलब्ध झाला आणि त्याचा ठावठिकाणा सापडला. त्यावरून २५ जून २०१७ रोजी त्याच्या वडिलांचा शोध लागला़ त्याच्याआई-वडिलांना येथे बोलविण्यात आले़
२०११ पासून बेपत्ता : सन २०११ मध्ये रवी बेपत्ता झाला होता़ औरंगाबाद शहरात एकटा फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी औरंगाबाद बालगृहात करण्यात आली. त्यानंतर रवीला डोंगरी-मुंबई येथील बालगृहात पाठविण्यात आले. पुढे वर्षभरानंतर संगोपन तसेच शिक्षणासाठी त्याला सरोळा, जि़ अहमदनगर येथील गतिमंद शाळेत पाठविण्यात आले. तेथून २०१४ मध्ये धुळे बालकल्याण समितीतर्फे स्व़ एऩ के़ झेड मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित शिरपूर येथील गतिमंद मुला-मुलींच्या बालगृहात त्याला पुढील शिक्षणासाठी पाठविण्यात आले होते.