एच वेस्ट वॉर्ड : सेलिब्रटींच्या वॉर्डात कॉंग्रेससमोर भाजपाचे आव्हान
By admin | Published: December 29, 2016 02:08 PM2016-12-29T14:08:19+5:302016-12-29T14:50:37+5:30
मुंबईतील सेलिब्रेटी वॉर्ड म्हणून एच वेस्टची ओळख आहे. मायानगरी मुंबईच्या चंदेरी दुनियेतील अनेक सेलिबे्रटींचे या भागात वास्तव्य आहे.
- गौरीशंकर घाळे
मुंबई : मुंबईतील सेलिब्रेटी वॉर्ड म्हणून एच वेस्टची ओळख आहे. मायानगरी मुंबईच्या चंदेरी दुनियेतील अनेक सेलिबे्रटींचे या भागात वास्तव्य आहे. यापेक्षा महत्वाची आणि मोठी ओळख म्हणजे या वॉर्डातील स्वयंसेवी संस्थाचे जाळे. नागरी समस्यांपासून प्रत्येक बाबतीत या सजग स्वयंसेवी संस्थांची नजर असते. त्यामुळे प्रशासन आणि राजकारण्यांनाही या संस्थांशी जुळवून घेतच आपाल गाडा हाकावा लागतो.
मागील पालिका निवडणुकीत या वॉर्डातील सहा पैकी चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते तर शिवसेना आणि भाजपाकडे प्रत्येकी एक जागा आली होती. मात्र, लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही नरेंद्र मोदींच्या लाटेने सर्वच राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. पाली हिल, वांद्रे रेक्लेमेशन अशी श्रीमंत वस्ती तर खारदांडा, खिरानगर येथील सामान्य वर्गाच्या चाळी असा वर्ग या वॉर्डात आढळून येतो. दिवंगत काँग्रेस नेते सुनिल दत्त यांच्यामुळे श्रीमंत-अतिश्रीमंत वर्गाचा आणि मुस्लिम मतदारांचा ओढा कायम काँग्रेसकडे राहीला. त्यांची कन्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांनीही मागील निवडणुकीपर्यंत या वर्गाला काँग्रेसकडे ठेवण्यात यश मिळविले होते. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र सारेच चित्र बदलून गेले. नवमतदारांचा वाढीव टक्कयाने भाजपाला साथ दिली होती. भाजपाची विकासाची भाषा, योजना यामुळे भाजपाकडे गेलेला हा मतदार महापालिका निवडणुकीतही कोणती भूमिका घेतो यावर काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे.
भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानेही जाणीवपूर्वक स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या कार्यशैलीशी पूरक भूमिका घेत वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत येथील ख्रिश्चन मतदार, श्रीमंत वर्ग भाजपाच्या दिशेने सरकत असल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेससमोर भाजपाचे मोठे आव्हान असणार आहे. भाजपाच्या आक्रमक राजकारणाला रोखण्यासाठी राज्य अथवा विभागीय स्तरावर कोणतीच व्यवस्था सध्या दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनाच आपापला मतदार राखावा लागणार आहे. अन्यथा काँग्रेसी पंजा कमळाच्या धक्कासमोर कितपट टीकाव धरेल, ही शंकाच आहे.
शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला असला आणि एका जागी दुस-या क्रमांकाची मते असली तरी या वॉर्डातील मुख्य लढत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी असणार आहे.
अनधिकृत फेरीवाले आणि झोपडपट्टी
अनधिकृत फेरीवाले आणि झोपडपट्टया हा विषय मुंबईतील सर्वच वॉर्डांमधील डोकेदुखी आहे. मात्र, एच वेस्टमधील नागरिकांचा रेट्यामुळे अशा प्रशासनालाही कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक बनून जाते. या कारवाईस अडथळा निर्माण केल्यास राजकीय किंमत मोजावी लागण्याच्या भीतीने स्थानिक राजकारणीही माघार घेतात.
अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी
अरुंद अंतर्गत रस्ते आणि वाहनांची मोठी गर्दी, यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते. शिवाय लिंकीग रोड, पाली हिल वगैरे भाग आकर्षणाची केंद्र असल्याने होणा-या गर्दीमुळेही अनेकदा वाहतूक व्यवस्थेवर ताण जाणवतो.
कचरा वर्गीकरण
एच वेस्ट वॉर्डातून दररोज सुमारे ३५० मेट्रीक टन कचरा जमा होतो. कचरा वर्गीकरण आणि प्रक्रीयेचा महत्वाकांक्षी प्रकल्प या वॉर्डाने हाती घेतला आहे. नागरिकांनी घरातच कच-याचे वर्गीकरण करावे आणि पालिकेच्या तीन-चाकी सायकलींद्वारे हा वेगळा केलेला कचरा गोळा करण्याचे काम हात घेण्यात आले. मात्र, लोकांच्या वर्षानुवर्षांच्या सवयीमुळे अद्याप या मोहिमेला म्हणावे तसे यश आले नाही.
पब झोन
उशिरा पर्यत चालणारे पब आणि रेस्टोबारमुळे वांद्रयातील अनेक स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. पब-बारबाहेरची गर्दी, गोंगाट आणि वादावादी यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांची झोपमोड ठरलेली. यावर उपाय म्हणून या भागात खास पब झोन निर्माण करण्याची योजना पुढे आले. याबाबतचा प्रस्ताव सादर झाला असला तरी अंतिम निर्णय, अंमलबजावणी बाकी आहे.
------------------------------------
खिरा नगर, मुक्तानंद पार्क, नवयुग कॉलनी, एमएसइबी कॉलनी, सांताक्रुझ बस डेपो, वेलिंग्टन जिमखाना, डॉ. आ.बेडकर नगर, खार जिमखाना, रोटरी पार्क, खारदांडा, दांडा व्हिलेज, गोविंद नगर, कोळीवाडा, पाली व्हिलेज, पटवर्धन पार्क, युनियन पार्क, पाली हिल, बांद्रा तलाव, नॅशनल लायब्ररी, चिंबई व्हिलेज, डॉ. भाभा हॉस्पिटल, संतोष नगर, बांद्रा रेक्लेमेशन, बांद्रा बस डेपो, ओएनजीसी कॉलनी आदी भागाचा या वॉर्डात समावेश होतो.
नवीन रचना
९७ खुला
९८ खुला
९९ अनुसूचित जमाती
१०० इतर मागासवर्गीय
१०१ खुला
१०२ खुला महिला
प्रभाग क्रमांक ९७
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५४२२५
अनुसूचित जाती - १८८४
अनुसूचित जमाती - ७१५
प्रभागाची व्याप्ती - खिरा नगर, मुक्तानंद पार्क, नवयुग कॉलनी, एमएसइबी कॉलनी, सांताक्रुझ बस डेपो
प्रभाग क्रमांक ९८
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५७६८०
अनुसूचित जाती - ४१५२
अनुसूचित जमाती - २१३
प्रभागाची व्याप्ती - वेलिंग्टन जिमखाना, डॉ. आ.बेडकर नगर, खार जिमखाना, रोटरी पार्क
प्रभाग क्रमांक ९९
आरक्षण - अनुसूचित जमाती
एकूण लोकसंख्या - ५३६१५
अनुसूचित जाती - १७९०
अनुसूचित जमाती - १९६५
प्रभागाची व्याप्ती - खारदांडा, दांडा व्हिलेज, गोविंद नगर, कोळीवाडा
प्रभाग क्रमांक १००
आरक्षण - इतर मागासवर्गीय
एकूण लोकसंख्या - ५३०००
अनुसूचित जाती - १७०७
अनुसूचित जमाती -१३८
प्रभागाची व्याप्ती - पाली व्हिलेज, पटवर्धन पार्क, युनियन पार्क, पाली हिल
प्रभाग क्रमांक १०१
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५५४९८
अनुसूचित जाती - ४२३
अनुसूचित जमाती - १७१
प्रभागाची व्याप्ती - बांद्रा तलाव, नॅशनल लायब्ररी, चिंबई व्हिलेज, डॉ. भाभा हॉस्पिटल
प्रभाग क्रमांक १०२
आरक्षण - इतर मागासवर्ग
एकूण लोकसंख्या - ५५४७०
अनुसूचित जाती - ८१०
अनुसूचित जमाती - १२१
प्रभागाची व्याप्ती - संतोष नगर, बांद्रा रेक्लेमेशन, बांद्रा बस डेपो, ओएनजीसी कॉलनी.
२०१२ च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवार
प्रभागविजयी उमेदवारमतेपराभूत उमेदवारमते
९२गीता चव्हाण, शिवसेना ७२५७सीमा तिरोडकर, अपक्ष ६६०३
९३अलका केरकर, भाजपा ९९२२मेहक बच्छानी, काँग्रेस ७४१०
९४सुनिता वावेकर, काँग्रेस ७४९५लक्ष्मी पिंगे, शिवसेना ५८८२
९५असिफ झकेरिया, काँग्रेस ७९५४अजित मन्याल, भाजपा ६०३३
९६कॅरेल डिमेलो, काँग्रेस १०७६५अश्विनी रसाळ. भाजपा ७०१६
९७तन्वीर अली पटेल, काँग्रेस ९३२४निलिमा ठाकूर, अपक्ष ३४०३