‘हाबाडा’ फेम बाबुराव आडसकर यांचे निधन

By admin | Published: August 12, 2016 01:08 PM2016-08-12T13:08:17+5:302016-08-12T13:09:28+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रांगड्या व्यक्तीमत्वाने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे शुक्रवारी निधन झाले.

'Habada' fame Baburao Adskkar passes away | ‘हाबाडा’ फेम बाबुराव आडसकर यांचे निधन

‘हाबाडा’ फेम बाबुराव आडसकर यांचे निधन

Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १२ -  महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रांगड्या व्यक्तीमत्वाने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणा-या माजी आमदार बाबुराव आडसकर  (वय ९०) यांचे वृध्दापकाळाने शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या दरम्यान निधन झाले. सायंकाळी पाच वाजता त्यांच्या आडस या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
 
पंधरा दिवसांपूर्वीच त्यांचे सुपुत्र, डीसीसी बँकेच्या प्रकरणातील संशयित आरोपी मेघराज आडसकर यांनी आत्महत्या केली होती. या घटनेने व्यथित झाले होते. त्यांना मोठा धक्का बसला होता. गेल्या पंधरा दिवसात ते कोणाशी बोलतही नव्हते.
 
तब्बल ६५ वर्षे राज्याच्या राजकारणात ते सक्रिय राहिले. केज पंचायत समितीचे सदस्य म्हणून राजकारणाची सुरूवात करणाºया आडसकर यांनी सभापती म्हणूनही काम पाहिले. बापुसाहेब काळदाते यांच्या विरोधात केज मतदार संघातून त्यांनी १९७२ ची निवडणूक लढविली. संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या या निवडणुकीत त्यांनी काळदाते यांचा पराभव करत विधानसभा गाठली. त्यानंतर १९७८ ला चौसाळा मतदार संघातून ते आमदार झाले. १९८० ला रेणापूर मतदार संघातून त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. या निवडणुकीत मात्र त्यांचा सहा हजार मतांनी पराभव झाला. १९८६ साली त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली.
 
आपल्या ग्रामीण शैलीतील भाषणामुळे त्यांनी जशा सभा गाजवल्या, तसे विधी मंडळाचे सभागृहही दणाणून सोडले. प्रस्तापिथांना धक्का द्या, असा संदेश देताना ते ‘द्या हाबाडा’ असे आवाहन आपल्या सभांमधून करत असत. हा ‘हाबाडा’ शब्द पुढे राजकारणात इतका प्रचलीत झाला की या शब्दावरून आडसकरांना राज्यभर ओळखले जाऊ लागले.
 
केजपासून जवळच असलेल्या त्यांच्या आडस या गावी गेली साठ वर्षापासून ते दिवाळीच्या पाडव्याला पाडवा फराळाचे आयोजन करत असत. २५ ते ३० हजार लोक यासाठी आवर्जून उपस्थित राहत असत. दांडगा जनसंपर्क आणि ग्रामीण प्रश्नांची जाण यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर शेवटपर्यंत त्यांची मजबूत पकड होती.

Web Title: 'Habada' fame Baburao Adskkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.