हॅकरने मागितली ५२ लाखांची खंडणी
By admin | Published: July 1, 2017 07:46 AM2017-07-01T07:46:27+5:302017-07-01T07:46:27+5:30
जेएनपीटीमधील गेटवे टर्मिनल्स इंडियाची संगणक प्रणाली २७ जूनला हॅक करण्यात आली आहे. कंपनीचे २७० संगणक व लॅपटॉप
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, उरण : जेएनपीटीमधील गेटवे टर्मिनल्स इंडियाची संगणक प्रणाली २७ जूनला हॅक करण्यात आली आहे. कंपनीचे २७० संगणक व लॅपटॉप व्हायरसमुक्त करण्यासाठी प्रत्येकी ३०० डॉलर अशी एकूण ५२ लाख रुपयांची खंडणी हॅकरने मागितली असून, याविषयी जेएनपीटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) कंपनीच्या कायदेविषयी विभागाचे सहायक व्यवस्थापक व कंपनी सचिव म्हणून कार्यरत असलेले गिरीराज देशपांडे यांनी जेएनपीटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. जीटीआय ही एपीएम टर्मिनल्स कंपनीची उपकंपनी आहे. मुख्य कंपनी व उपकंपनीसाठी वापरण्यात येणारी संगणकप्रणाली एकच आहे. कंपनीचे जेएनपीटी पोर्ट येथे कंटेनर आयात-निर्यातीचे टर्मिनल्स असून ते जेएनपीटीकडून २००४ मध्ये ३० वर्षांच्या भाडेकरारावर घेतले आहे. या बंदरामध्ये रोज ५ ते ७ हजार कंटेनरची हाताळणी केली जात आहे. ही सर्व हाताळणी संगणक प्रणालीद्वारे केली जात आहे. यासाठी आवश्यक माहिती तंत्रज्ञान प्रणाली कंपनीच्या सर्व ग्रुपशी जोडण्यात आली आहे. कामकाजासाठी आवश्यक सर्व माहिती जीटीआय हाउसच्या सर्व्हरमध्ये आहे. २७ जूनला सायंकाळी ४ वाजता संगणक प्रणालीमध्ये व्हायरस शिरला. संगणकावर सर्व सिस्टीम हॅक केल्याचे मॅसेज दिसू लागले. अज्ञात व्यक्तीने सर्व यंत्रणा हॅक केली. यामुळे कंपनीमधील तब्बल २७० संगणक व लॅपटॉपमध्ये हा व्हायरस शिरला. संगणकामधील व्हायरस दूर करून सर्व माहिती पूर्ववत करण्यासाठी प्रतिसंगणक ३०० डॉलरची खंडणी मागितली आहे.
सायबर हल्ल्यामुळे जीटीआय कंपनीचे सर्व कामकाज २७ जूनपासून ठप्प झाले आहे. कंपनीचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. याशिवाय कंपनीची प्रतिमा खराब झाली आहे. सायबर हल्ल्याविषयी इतर कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून काही उपाययोजना करता येतील का? याविषयी चाचपणी करण्यात आली; परंतु अद्याप त्याविषयी काहीही उपाय सापडलेला नाही. कंपनीच्या आयटी प्रमुखांशी चर्चा करूनही यामधून काही मार्ग सापडेल का? याची माहिती घेतली जात आहे; अखेर कंपनी व्यवस्थापनाने जेएनपीटी पोलीस स्टेशनमध्ये हॅकरविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.