युतीत २५ वर्षे काय घडलं? मुख्यमंत्र्यांनी तीन वाक्यांत सांगितलं; सभागृहात एकच हशा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 01:26 PM2021-11-02T13:26:11+5:302021-11-02T13:35:23+5:30
बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन; मुख्यमंत्री ठाकरेंचे विरोधकांना टोले
पुणे: केवळ विचारधारा पटत नाही म्हणून विकासाला अडथळा आणणार नाही. ती महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि तसे संस्कार आमच्यावर झालेले नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. बारामतीमधील इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबाच्या कामाचं कौतुक करत विरोधकांना टोले लगावले.
इन्क्युबेशन सेंटर उभारणारी संस्था तरुणांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचं काम करते. हे काम खूप आव्हानात्मक आणि मोठं आहे. इन्क्युबेशन सेंटरला मराठीत उबवण्याचं केंद्र म्हणतात. आम्हीदेखील २५ वर्षे हे सेंटर चालवलं. त्यात नको ती अंडी उबवली. त्यांचं पुढे काय झालं ते तुम्ही पाहिलंत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपसोबतच्या २५ वर्षांच्या युतीवर खोचक भाष्य केलं.
पवार कुटुंबानं राज्यासाठी केलेलं काम खूप मोठं आहे. शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला. ते अजूनही थांबायला तयार नाहीत. त्यांचं काम अविरत सुरू आहे. मी दुसऱ्यांदा बारामतीला आलो आहे. पहिल्यांदा आलो तेव्हा शेतीचं प्रदर्शन पाहिलं. आज देशातलं सर्वात मोठं इन्क्युबेशन सेंटर पाहतोय. संपूर्ण पवार कुटुंब विकासाच्या ध्यासानं काम करतंय, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवार परिवाराचं कौतुक केलं.
टीकाकर असलेच पाहिजेत. पण चांगल्या कामात अडथळे आणणं ही आपली संस्कृती नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगितली. आम्ही शरद पवारांचे टीकाकार होतो. पण तरीही शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री होती. शरद बाबू बारामतीत काय करतात, ते जाऊन पाहायला हवं, असं बाळासाहेब म्हणायचे. हीच आपली संस्कृती आहे. एखादा चांगला काम करत असेल, तर त्याचं कौतुक करा. त्याला पाठिंबा देणं जमत नसेल, तर किमान त्याच्या कामात विघ्न तरी आणू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.