हाफीजला बाळासाहेबांना धडा शिकवायचा होता - हेडली

By admin | Published: March 26, 2016 10:48 AM2016-03-26T10:48:04+5:302016-03-26T10:48:04+5:30

26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता असा खळबळजनक खुलासा डेव्हिड हेडलीने केला आहे

Hafiz wanted to teach Balasaheb a lesson - Headley | हाफीजला बाळासाहेबांना धडा शिकवायचा होता - हेडली

हाफीजला बाळासाहेबांना धडा शिकवायचा होता - हेडली

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २६ - 26/11  दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता असा खळबळजनक खुलासा डेव्हिड हेडलीने केला आहे. बाळासाहेबांना धडा शिकवायचा आहे असं मला हाफीज सईदेने स्वत: सांगितलं होतं अशी माहिती हेडलीने उलटतपासणीदरम्यान दिली आहे. 26/11 हल्ल्याप्रकरणी अमेरिकेत शिक्षा भोगत असलेल्या हेडलीची मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उलटतपासणी सुरु आहे. 
 
काम पुर्ण करायला 6 महिने लागतील असं मी हाफीजला सांगितलं होतं. त्यानंतर मी शिवसेना भवन आणि बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीची रेकी केली होती. बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीवरील काही सुरक्षारक्षकांची मी भेटदेखील घेतली होती अशी धक्कादायक माहिती डेव्हिड हेडलीने न्यायालयात दिली आहे. 
सीबीआय मुख्यालय तन्ना हाऊस, महाराष्ट्र विधानभवनची मी रेकी केली होती मात्र इस्त्राईल दुतावासाची रेकी केली नव्हती. माझ्या चौकशीदरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मला 6-7 फोटो दाखवले ज्यावर नाव लिहिली होती. मात्र वकिलांनी आक्षेप घेतल्यानंतर एनआयएने नावांशिवाय फोटो दाखवले होते. एनआयएने दाखवलेल्या फोटोंच्या आधारे मी न्यायालयात फोटो ओळखले असं म्हणणं चुकीचे असून 6 ते 7  फोटोंपैकी मी फक्त एकच ओळखला असल्याचं हेडलीने सांगितलं आहे. 
 
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांच्या हत्येचा मी आणि माझ्या सहका-यांनी कट रचला होता ही माहिती चुकीची असल्याचं हेडलीने न्यायालयात यावेळी सांगितलं आहे. दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) माझा जबाब आपल्या शब्दात लिहिला, त्यांनी माझी वाक्यं त्याच शब्दांमध्ये नोंदवली नाहीत असा गंभीर आरोपदेखील हेडलीने न्यायालयात केला आहे. जबाब नोंद करुन झाल्यानंतर त्यांनी माझ्यासमोर तो कधीच वाचून दाखवला नाही. एनआयएने असं का केलं ? हे मी सांगू शकत नाही. कदाचित ते विसरले असतील अशी माहिती हेडलीने न्यायालयात दिली आहे. 
 
2006 मध्ये लखवीने लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर म्हणून मुझम्मिल भटशी माझी ओळख करुन दिली होती. अक्षरधाम आणि इशरत जहाँ प्रकरणात मुझम्मिल भटचा सहभाग असल्याचंही मला लखवीने सांगितलं होतं. मुझम्मिलचे सर्व मोठे हल्ले फसले असं एनआयएला मी कधीच सांगितलं नसल्याचा दावा हेडलीने केला आहे.
बचावपक्षाच्या वकिलांनी इशरत जहाँबद्दल हेडलीने एनआयएला सांगितलं नसल्याचा दावा न्यायालयात केला आहे. हेडली मात्र आपण एनआयएला इशरत जहाँबद्द्ल सांगितलं असल्याचा दावा करत आहे. एनआयएला मी लष्कर-ए-तोयबाची महिला शाखा असून अबु ऐमानची आई त्याची प्रमुख असल्याची माहिती देखील दिली होती असं हेडलीने उलटतपासणीदरम्यान न्यायालयात सांगितलं आहे. 
 

Web Title: Hafiz wanted to teach Balasaheb a lesson - Headley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.