राज्यात उद्यापासून गारपिटीचा अंदाज, हवामानातील बदलाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 06:01 AM2021-02-15T06:01:08+5:302021-02-15T06:01:55+5:30
Hail forecast in the state from tomorrow : राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १३.२ अंश नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश नोंदविण्यात आले आहे.
मुंबई : उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात चक्रावात कायम आहे. केरळ किनारपट्टीलगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रातील चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा आता केरळ किनारपट्टी ते उत्तर मध्य महाराष्ट्रपर्यंत आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम म्हणून १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि
विदर्भात पावसासह गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १३.२ अंश नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९.४ अंश नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.
विदर्भाच्या बऱ्याच भागात तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
१६ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यासह विदर्भात पाऊस पडेल.
१७ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडेल.
विदर्भात गारा कोसळतील.
१८ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र
आणि मराठवाड्यात पाऊस पडेल,
तर विदर्भात गारा कोसळतील,
असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
वातावरणातील या बदलांमुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांना
हाताशी आलेले पीक कापनी करून सुरक्षित जागी ठेवण्याची सूचना केली आहे.