गारपिटीचा शेतीला तडाखा!
By Admin | Published: April 30, 2017 12:13 AM2017-04-30T00:13:16+5:302017-04-30T00:13:16+5:30
पिकांचे नुकसान; सांगली, लातूर, बीड, उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
सांगली/लातूर : राज्यात उष्णतेचा कहर सुरू असताना अवकाळी पावसाने तोंड वर काढले आहे. सांगली व मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाला शनिवारी गारपिटीचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटात, वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने परिसराला अक्षरक्ष: झोडपून काढले.
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले, तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मापाविना बाजार समितीत पडून असलेली हजारो क्विंटल तूर भिजली. उद्या रविवारी (पान १२ वर)
दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांना या पावसाचा तडाखा बसला. यामुळे आंबा तसेच द्राक्ष बागांचे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात चौसाळ्यासह हिंगणी खुर्द व बुदू्रक परिसरात पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी तयार करुन ठेवलेल्या ज्वारी खळ््यांचे नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात वीज पडून तीन दुभती जनावरे दगावली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
हजारो क्विंटल तूर भिजली
मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात गारपिट झाली. चाकूर, जळकोट आणि जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हजारो क्विंटल तूर या पावसामुळे भिजली़ गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीच्या आवारात ही तूर मापाविना पडून होती, परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़
----------
पारा चाळीशीपार
विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा चाळिशीवर असून, मध्य महाराष्ट्रातील बुतांश जिल्ह्यातील तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. शनिवारी विदर्भातील ब्रम्हपुरीचे तापमान सर्वाधिक ४४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. विदर्भातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. मराठवाडा, खान्देशातील पाराही वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात नगर आणि मालेगाव मधील तापमानाचा पारा ४१.६ इतका नोंदविण्यात आला.
द्राक्षबागांचे पुन्हा नुकसान
महिन्याभरापूर्वी द्राक्ष हंगामाच्या काळात सांगलीतील सावळज (ता. तासगाव) परिसरात गारपिटीने बागांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा याच परिसरात अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागांची खरड छाटणी घेतली आहे. नवीन फुटवा असलेल्या बागांचे पुन्हा मोठे नुकसान झाले आहे. लातूर, उस्मानाबादमधील द्राक्ष पिकांनाही फटका बसला.