ओला-उबरला ‘टायगर’ची टक्कर
By admin | Published: July 13, 2017 02:14 AM2017-07-13T02:14:03+5:302017-07-13T02:14:03+5:30
मुंबईकरांना अॅप बेस वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी आता नवा पर्याय मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांना अॅप बेस वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी आता नवा पर्याय मिळाला आहे. ‘टायगर’ नावाच्या अॅप बेस टॅक्सी सेवेचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. प्रवाशांसाठी मोफत वाय-फाय, वातानुकूलित प्रवास आणि कॅशलेस सुविधांयुक्त तब्बल ५ हजार टॅक्सी मुंबईत धावणार आहेत. त्यामुळे ‘अॅप बेस टॅक्सी’ सेवेच्या शर्यतीत आणखी एक स्पर्धक आला आहे. या स्पर्धेतून मुंबईकरांना तत्पर सेवा मिळणे, अधिक सोपे होणार आहे.
कोलकाता येथील या ‘अॅप बेस टॅक्सी’ सेवेमुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सींसह ओला-उबरच्या शर्यतीत आणखी एक स्पर्धक वाढला आहे. इंदोर आणि रांची शहरांतदेखील ही अॅप बेस टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे.
काळी-पिवळी टॅक्सीच्या ‘आमची ड्राइव्ह’ या अॅपसह ओला, उबर, मेरू, ईजी कॅब, टॅब कॅब या कंपन्यांची अॅप बेस टॅक्सी सेवा सध्या मुंबईत सुरू आहे. त्यात ‘टायगर’च्या ५ हजार टॅक्सींची भर पडल्याने मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची शक्यता आहे. टायगर अॅपमध्ये हॅचबॅक, सीडेन आणि एसयूव्ही संवर्गाच्या पहिल्या तीन किलोमीटरसाठीचे बेस फेअर अनुक्रमे ५०, ६० आणि १०० रुपये असणार आहे. तर त्यापुढील प्रतिकिलोमीटर साठी अनुक्रमे १३, १५ आणि १८ रुपये मोजावे लागणार आहे.
बी२बी (बिझनेस टू बिझनेस) आणि बी२सी (बिझनेस टू कन्झ्युमर) या तत्त्वावर ही सेवा चालणार आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीमध्ये टॅक्सी सेवा सुरू केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पोद्दार यांनी सांगितले. ते म्हणाले की, भविष्यात बाइक टॅक्सीसह, माल वाहतूक, रुग्णवाहिका अशा सुविधादेखील या अॅपवर पुरवण्यात येतील.
>मुंबईकरांसाठी अॅपबेस सेवेची तुलना
अॅप बेस सेवा बेस फेअरबेस फेअर
नंतरचे भाडे
टायगर ५० (प्रति ३ किमी) १३
मेरु २७ (प्रति १ किमी)२०
उबर ७० (प्रति १ किमी)१०
ओला १०० (प्रति ४ किमी)११
ईजी कॅब २७ ( प्रति १ किमी)२०
टॅब कॅब ९० ( प्रति ४ किमी)२२