राजेवाडीत गारपीट, डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त
By admin | Published: June 10, 2014 10:40 PM2014-06-10T22:40:54+5:302014-06-10T23:26:47+5:30
पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागात वादळी वार्यासह गारपिटीने डाळिंब, ऊस, पावटा, गुलछडी, मका यांसारख्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
राजेवाडी : पुरंदर तालुक्याच्या पूर्वभागात वादळी वार्यासह गारपिटीने डाळिंब, ऊस, पावटा, गुलछडी, मका यांसारख्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
काल दि. ९ रोजी सायंकाळी ५ वाजता वादळी वार्यासह जोरदार पावसाने सुरुवात केली. वादळी वार्यासह राजेवाडीतील नवीन रेल्वे स्टेशनजवळील रानमळा, तक्रारवाडी, वायकरवाडी, स्वामी समर्थ मठ परिसरात अर्धा तास गारपीट सुरू होती. या गारपिटीने संभाजी नामदेव जगताप, अमृता जगताप, हरिभाऊ जगताप, दत्तात्रय जगताप यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या डाळिंबांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. आतापर्यंतच्या गारपिटीत वादळी वार्यामध्ये बागा वाचल्या होत्या. मात्र, कालच्या गारपिटीने सर्व डाळिंबांचे नुकसान झाले असून, पावटा, गुलछडी, कापरी यांसारख्या फुलांची शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. आतापर्यंत ऐन उन्हाळ्यात शेतकर्यांनी जिवाचा आटापिटा करून बागा लाखो रुपये खर्च करून वाढवल्या होत्या. मात्र, गारपिटीने प्रचंड नुकसान झाल्याचे लालूअण्णा जगताप यांनी सांगितले.
या गारपिटीची माहिती मंडल अधिकारी सुरेश कुंभार यांना शेतकर्यांनी दिली. तालुका कृषी अधिकारी ढगे यांनी कृषी सहायक जगताप व गाव कामगार तलाठी यांना वस्तुस्थितिजन्य पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व नुकसानीचा पंचनामा करून तहसील कार्यालयात सादर करणार असल्याचे मंडलाधिकारी सुरेश कुंभार यांनी सांगितले.
वादळी वार्याने विद्युत पुरवठा खंडित, २० खांब पडले
वादळी वार्यासह जोरदार पावसाने राजेवाडी महावितरण कार्यालयाअंतर्गत येणार्या मावडी येथील ११ के. व्ही. चे ३ खांब, सिमेंटचे ३ खांब, पिसर्वे येथील २ खांब, नायगाव व राजुरी येथील १० खांब पडले. रात्रभर युद्धपातळीवर कामे सुरू असून, लवकरात लवकर विद्युतपुरवठा सुरळीत करणार असल्याची माहिती राजेवाडी येथील महावितरणचे शाखा अभियंता अमोल जाधव यांनी दिली.