गारपिटीचा तडाखा : राज्यात अवकाळी पावसाचे ७ बळी, मराठवाडा, विदर्भ व खान्देशवर निसर्ग कोपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:22 AM2018-02-12T03:22:14+5:302018-02-12T03:22:24+5:30
यंदा लांबलेल्या पावसामुळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून बळीराजा सावरत असताना, रविवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा बळी गेला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
औरंगाबाद / नागपृर/ अकोला/ जळगाव : यंदा लांबलेल्या पावसामुळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून बळीराजा सावरत असताना, रविवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा बळी गेला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, रविवारी सकाळी वादळी वाºयासह गारपीटही झाल्याने दाणादाण उडाली. तूर, हरबरा, गहू, ज्वारी ही काढणीला आलेली पिके गारांच्या तडाख्यात सापडल्याने भुईसपाट झाली, तर संत्रा आणि द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
विदर्भावर वीज कोसळली
वादळी पावसासह गारपिटीचा विदर्भाला तडाखा बसला. तूर, हरभरा, गहू, मिरची व संत्राबागांचे नुकसान झाले. विदर्भात रविवारी दिवसभर विजांचा कडकडाट सुरू होता. अंगावर वीज पडून चौघांचा मृत्यू, तर १६ जण जखमी झाले. अमरावती जिल्ह्यात पहाटे झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांना जबर फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील गुंज, बिजोरा, डोंगरगाव येघे जोरदार पाऊस झाला. वरूड तालुक्यातील वाई येथे चराईसाठी जाणारी सात जनावरे वीज पडून दगावली. बुलडाणा जिल्ह्यात गारपिटीसह विजा कोसळल्या. नागपूरमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली.
७ जणांचे बळी -
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात सात जणांचे बळी गेले आहेत. जालना जिल्ह्यात वंजारउम्रद येथील नामेदव लक्ष्मण शिंदे (६०) व निवडुंगा येथील आसाराम गणपत जगताप (६०) या दोन शेतकºयांचा आणि वाशिम जिल्ह्यातील महागाव येथील यमुनाबाई हुंबाड या वृद्ध महिलेचा गारांच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला. तर अंगावर वीज पडून बुलडाणा जिल्ह्यातील निकिता गणेश राठोड, दर्यापूर तालुक्यातील नायगाव येथील गंगाधर आत्माराम कोकाटे (७६) आणि गोंदिया जिल्ह्यातील विनोद कुसन गावळकर (२८,रा.जेठभावडा) यांचा मृत्यू झाला.
पंचनाम्याचे आदेश
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, तसेच जिल्हा प्रशासनाने सोमवारी विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत तातडीने प्रस्ताव तयार करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
राज्याच्या अनेक भागांत वादळ आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून, सरकारने गारपिटग्रस्तांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याअगोदर भरपाई द्यावी.
-राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते
जळगाव जिल्ह्याला तडाखा : गिरणा व तापी नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये गारपीट झाली. त्यात गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले असून, केळीच्या बागाला फटका बसला आहे. हाताशी आलेला रब्बीच्या हंगामाला फटका बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
मराठवाड्यात काश्मीरसदृश्य स्थिती
सर्वत्र गारांचा खच साचल्याने जालना, परभणी व बीड जिल्ह्यात तर काश्मीरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सुमारे दीडशे ग्राम वजनाच्या गारांचा मारा झाल्याने अनेक जण जखमी झाले. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, अंबड, घनसावंगी, बीड जिल्ह्यातील शिरुर, वडवणी, गेवराई, माजलगाव तालुक्यात आणि परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्याला या गारपिटीचा फटका बसला.