गारपिटीत पानमळा शेतीचा आधार !

By Admin | Published: April 20, 2015 02:19 AM2015-04-20T02:19:42+5:302015-04-20T02:19:42+5:30

दुष्काळ अन् वारंवारच्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पारंपरिक पिकांना फाटा देत नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता. हदगाव) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी पानमळा

Hailstorm farming base! | गारपिटीत पानमळा शेतीचा आधार !

गारपिटीत पानमळा शेतीचा आधार !

googlenewsNext

रामेश्वर काकडे, नांदेड
दुष्काळ अन् वारंवारच्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी पारंपरिक पिकांना फाटा देत नांदेड जिल्ह्यातील चाभरा (ता. हदगाव) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी पानमळा शेतीचा नवा पॅटर्न निर्माण केला आहे. विशेष म्हणजे गारपिटीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना या पिकाने मोठा आर्थिक आधार दिला आहे.
मराठवाड्यात चर्चेच्या ठरलेल्या या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी शेतकरी चाभरा गावाला भेट देत आहेत. सिंचन व्यवस्थेने चाभरा गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, शेतकरी केळी, हळदीसह सोयाबीन, कापसाला पसंती देतात. मात्र दरवर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असून, बाजारात कापूस, सोयाबीन या पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत अल्प भाव मिळतो. त्याउलट नागवेलींच्या पानांना १२ महिने चांगला भाव मिळत असल्याने अनेक तरुण शेतकरी पानमळा शेतीकडे वळले व त्यांनी एकत्रितपणे नवा पॅटर्न राबविला. त्यातून इतर शेतकरीही पानमळा शेती करण्याचा विचार करीत आहेत.
पाच वर्षांपूर्वी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात पानमळा शेतीचे क्षेत्र घटले होते. मात्र सध्या पानमळा शेतीत चाभरा गाव नांदेड जिल्ह्यात आघाडीवर असून, त्यानंतर बारडच्या दोन शेतकऱ्यांनी पानमळ्याला प्राधान्य दिले आहे.
ईश्वर उमाजी मरकुंदे यांनी त्यांच्या २५ एकर शेतीमधील साडेतीन एकरात नागवेली पानाच्या कपुरी जातीची लागवड केली. प्रथमत: शेवरी, शेवगा यांची जून महिन्यात सरी पद्धतीने लागवड करीत सप्टेंबरमध्ये शेवग्याच्या बुुंध्याशी नागवेलीची दोन फुटांच्या अंतराने लागवड केली. लागवडीपूर्वी शेणखताचा वापर केला. विशेष म्हणजे पाऊस, गारपिटीमुळे नुकसान होऊ नये, यासाठी पानमळा नेटच्या कपड्याने संरक्षणाचा नवा मार्ग अवलंबिला आहे. पानमळ्यातून वर्षाकाठी एकरी चार ते साडेचार लाखांचे उत्पादन निघते. त्यातून दोन लाखांचा लागवडीचा खर्च वजा जाता दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न हाती लागते. त्यातून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहता येथील बाजारपेठेत चाभऱ्यातील शेतकरी पाने विक्रीसाठी नेतात. एक हजार पानांना २५० ते ५०० रुपयांपर्यंतचा भाव मिळतो. पावसाळ्याच्या दिवसांत निघणाऱ्या नागवेलीच्या कोवळ्या पानांना परभणीच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

Web Title: Hailstorm farming base!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.