विदर्भ-मराठवाड्यात गारपीट, आजही झाेडपणार; पिकांचे नुकसान, नागरिकांचीही तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 06:29 AM2023-05-01T06:29:43+5:302023-05-01T06:29:53+5:30
मुंबई महानगर प्रदेशात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची नोंद होत असून, मुंबईच्या पश्चिम उपनगरात तुरळक सरींची नोंद झाली
मुंबई : गेले सहा दिवस राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीट होत असून शनिवारी रात्री व रविवारी पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात गारपीट झाली. दरम्यान १ मे रोजी पुन्हा गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पश्चिमी प्रकोपातील साखळ्यामुळे पाऊस, गारपीट होत असून, १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह अवकाळी पावसाची तीव्रता अधिक जाणवते. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. तर सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे तीव्रता अधिक जाणवेल. मराठवाड्यात ४ मेपर्यंत अवकाळी वातावरण टिकून राहणार आहे. विदर्भातही ४ मेपर्यंत अवकाळी वातावरणासह पावसाची तीव्रता अधिक राहील, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेशात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची नोंद होत असून, मुंबईच्या पश्चिम उपनगरात तुरळक सरींची नोंद झाली असतानाच ठाण्यात पावसाची मान्सूनसारखी बरसात झाली.
यलो, ऑरेंज अलर्ट
१ मे : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
२ मे : विदर्भात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
३ मे : मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे रविवारी दुपारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भाजी मंडई आणि हनुमान मंदिर परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. तर वाशिम जिल्ह्यातील सायखेडा परिसरात लिंबापेक्षा माेठ्या आकाराच्या गारा पडल्या. यामुळे पिकांचे नुकसान झाले.