गारपीटग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या अन्यथा आंदोलन – रविकांत तुपकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:47 IST2018-02-12T16:46:27+5:302018-02-12T16:47:07+5:30
दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा...

गारपीटग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या अन्यथा आंदोलन – रविकांत तुपकर
मुंबई - दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला.
जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, 10 व 11 फेब्रुवारी रोजी विदर्भ-मराठवाड्यात राज्यात अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, गहु, हरभरा, तुर, भाजीपाला व द्राक्ष बागांना मोठ्या फटका बसला. शेतकऱ्यांची ही पीके अक्षरश: जमीनदोस्त झाली. आधिच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील 356 गावांना या गारपिटीचा फटका बसला. तर वीज पडुन एकाच मृत्यु झाला. राज्यातील हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. बोंडअळीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत असतांना अचानक झालेल्या या गारपीटीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारने कपाशीवर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही हे अनुदान शेकतऱ्यांना मिळाले नाही. सरकारच्या या घोषणेवर आता आमचा विश्वास नाही. राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने अनुदान जमा करावे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. छत्रपती शिवरांच्या काळात शेतकऱ्यांनी कधीच आत्महत्या केल्या नाहीत. मात्र छत्रपतींचे नांव घेवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची थट्टा सुरु केली आहे. राज्यात अचानक झालेल्या या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.