गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा, विदर्भात वीज पडून चौघांचा मृत्यू : मराठवाडा, खान्देशलाही झोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 08:49 IST2025-04-04T08:48:32+5:302025-04-04T08:49:21+5:30

Unseasonal Rains: गेल्या दोन दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र, लातूर, परभणी, रत्नागिरी आणि विदर्भात भंडारा तसेच यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.

Hailstorm, unseasonal rains, lightning strike in Vidarbha, four dead: Marathwada, Khandesh also hit | गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा, विदर्भात वीज पडून चौघांचा मृत्यू : मराठवाडा, खान्देशलाही झोड

गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा, विदर्भात वीज पडून चौघांचा मृत्यू : मराठवाडा, खान्देशलाही झोड

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र, लातूर, परभणी, रत्नागिरी आणि विदर्भात भंडारा तसेच यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. तीन ठिकाणी वीज पडल्याने विदर्भात चौघांचा मृत्यू झाला. 

प. महाराष्ट्रात जोर’धार’ 
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. कोल्हापूर शहरात काही ठिकाणी गारपीट झाली. सांगलीत शिराळा तसेच खानापूर तालुक्यातील लेंगरे परिसरात मेघगर्जनेसह पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील सोनवडी, गजवडी परिसरात गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरीत पहाटे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड आदी भागांत जोरदार पाऊस झाला.

नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरीने गारवा 
नागपूर : नागपूरकरांची उन्हाच्या काहिलीतून पावसाने सुटका केली. बुधवारनंतर गुरुवारीही पहाटे वादळी वाऱ्यासह व दुपारी गडगडाटासह पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते.  

जालना, लातुरात गारपीट
परभणी : परभणी जिल्ह्यात मानवत रोड, मानवत शहर, झरी, बामणी, येलदरी येथे वादळी वाऱ्यासह गुरुवारी दुपारी चार ते सहाच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. 
लातूर : शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, टरबूज, खरबूज, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 
जालना : जिल्ह्यातील विविध भागांत गुरूवारी दिवसभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात फळपिकांसह रब्बीतील पिकांचेही मोठे नुकसान झाले. भोकरदन तालुक्यातील वरूड बुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्गखोल्यांवरील पत्रे उडून गेली. भोकरदन, मंठा तालुक्यातील काही भागात गारपीटही झाली.

भंडारा २, वाशिम १, तर यवतमाळात एकाचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यातील पाथरी (ता. तुमसर) येथे दुपारी विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. शेतातून घरी परतत असताना तिघे जण झाडाखाली थांबले होते. त्याच वेळी झाडावर वीज कोसळली. यात मनीषा भारत पुष्पतोडे (३२), प्रमोद मनिराम नागपुरे (४२) या दोघांचा मृत्यू झाला.
यवतमाळमधील झरी तालुक्यात बंदी वाढोणा येथे वसंता नरसिंग चव्हाण (३८) यांचा तर वाशिम जिल्ह्यात कवठा (ता. रिसोड) येथे चंद्रविलास काठोळे (४०) या मजुराचा वीज पडून मृत्यू झाला.  

आजही अवकाळीचा इशारा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात शुक्रवारीही काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडेल. 

नाशिक : पिकांचे नुकसान
नाशिक जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, टोमॅटो, मिरची, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका कळवण, बागलाण तालुक्यांना बसला आहे. १२०० ते १३०० हेक्टरवरील कांद्याला फटका बसल्याचा अंदाज आहे.

Web Title: Hailstorm, unseasonal rains, lightning strike in Vidarbha, four dead: Marathwada, Khandesh also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.