बारा जिल्ह्यांत गारपीट, अवकाळीचा फटका; वीज काेसळून विदर्भात तिघे ठार, पिके व भाजीपाल्याचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 06:55 AM2021-12-29T06:55:32+5:302021-12-29T06:55:59+5:30
काही ठिकाणी बोराच्या वा हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. एके ठिकाणी वीज पडून २५ बकऱ्यांचा मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यात एका शेतकरी तर भंडारा जिल्ह्यात एक बालक वीज काेसळून मरण पावले.
नागपूर/औरंगाबाद/अकोला : मंगळवारी विदर्भातील अकाेला, वाशिम, बुलडाणा, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व तसेच अहमदनगर जिल्ह्यांना अवकाळी व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. विदर्भात वीज कोसळून तिघे ठार झाले.
काही ठिकाणी बोराच्या वा हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. एके ठिकाणी वीज पडून २५ बकऱ्यांचा मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यात एका शेतकरी तर भंडारा जिल्ह्यात एक बालक वीज काेसळून मरण पावले. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे बुधवारी पावसाची शक्यता असल्याचे, हवामान शास्त्र विभागाने कळविले आहे.
पिकांचे नुकसान
अवकाळी व गारपिटीमुळे तुरीसह रब्बीतील हरभऱ्यासह अन्य पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. भाजीपाला व फळपिकांचेही नुकसान झाले. अनेक भागात साेंगून ठेवलेले साेयाबीन भिजले तर मका, गहू, कांदा पिकाचेही नुकसान झाले.
मराठवाड्यातही तडाखा
- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर तसेच वैजापूर तालुक्यातील काही भागांत गारपिटीचा तडाखा बसला, तर सिल्लोड व कन्नड तालुक्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.
- जालनाच्या भोकरदन तालुक्यातील
विविध ठिकाणी मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. वालसावंगी येथे वीज पडून एक बैल ठार झाला.
- अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात गारपिटीसह अवकाळीने गोदाकाठच्या कांदा
व हरभरा पिकांचे नुकसान झाले. दाट धुक्यामुळे नागपूर विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.