केस कापणे झाले महाग!
By Admin | Published: May 20, 2017 02:50 AM2017-05-20T02:50:29+5:302017-05-20T02:50:29+5:30
राज्यातील हेअर कटिंग सलून आणि पार्लरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने या वर्षी हेअर कटिंग आणि दाढीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला
- चेतन ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील हेअर कटिंग सलून आणि पार्लरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने या वर्षी हेअर कटिंग आणि दाढीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान १० टक्के दरवाढ करण्यास असोसिएशनने परवानगी दिल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष दीपक यादव यांनी सांगितले की, दरवर्षी असोसिएशनकडून किमान दरवाढ सुचविली जाते. त्यानंतर विभागनिहाय बैठका होऊन दरवाढ केली जाते. १ एप्रिलपासून नवी दरवाढ राज्यभरात लागू करण्यास असोसिएशनने सांगितले आहे. यापुढे टप्प्याटप्प्याने विभागनिहाय बैठका झाल्यावर संपूर्ण राज्यभर ही दरवाढ लागू झालेली दिसेल. दरवर्षी १ जानेवारीला ही दरवाढ घोषित केली जाते. मात्र यंदा नोटाबंदीच्या निर्णयामुळे दरवाढ लांबणीवर गेली. तरी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ दर्जाच्या सलून व पार्लरमध्ये ही दरवाढ लागू होईल.
अशी होईल वाढ
‘अ’ दर्जात मोडणाऱ्या वातानुकूलित आणि नामांकित सलूनमध्ये १० टक्क्यांनी वाढ होईल. त्यानुसार केस कापून घेण्यासाठी या सलूनमध्ये आता १०० रुपयांपासून १५० रुपये मोजावे लागतील. याउलट ‘ब’ व ‘क’ दर्जातील दरवाढ ही १५ ते २० टक्क्यांनी झाल्याचे दिसते. याआधी ‘ब’ दर्जाच्या सलूनमध्ये ७० रुपये आकारण्यात येत होते, त्या ठिकाणी आता ८० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. तर ‘क’ दर्जाच्या सलूनमध्ये केस कापण्यासाठी ४० रुपयांऐवजी आता ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
दाढीचे दर ‘जैसे थे’, कटिंग २५ टक्क्यांनी महागली
केस कापून घेण्यासाठी सर्वसामान्यांना ४० रुपयांऐवजी ५० रुपये मोजावे लागणार असले, तरी दाढीसाठी मात्र पूर्वीप्रमाणेच ३० रुपये मोजावे लागणार आहेत. घरीच दाढी करण्याची विविध साधने उपलब्ध झाल्याने दाढीच्या दरात वाढ केली नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. याउलट हेअर कटिंग ही २५ टक्क्यांपर्यंत महागल्याचे दिसले.