यंदा भारतीयांसाठी हज यात्रा २० हजारांनी महागली

By admin | Published: June 7, 2017 05:27 AM2017-06-07T05:27:30+5:302017-06-07T05:27:30+5:30

हज कमिटी आॅफ इंडियाने या वर्षीच्या हज यात्रेसाठीच्या शुल्काची निश्चिती केली

Haj pilgrimage for Indians is 20 thousand more expensive | यंदा भारतीयांसाठी हज यात्रा २० हजारांनी महागली

यंदा भारतीयांसाठी हज यात्रा २० हजारांनी महागली

Next

जमीर काझी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हज कमिटी आॅफ इंडियाने या वर्षीच्या हज यात्रेसाठीच्या शुल्काची निश्चिती केली असून, यंदा सरासरी २० हजार रुपयांनी ही यात्रा महागली आहे. परकीय चलन व उपलब्ध अतिरिक्त सुविधांमुळे हे दर वाढविण्यात आल्याचा कमिटीचा दावा आहे. सोबतच प्रतीक्षा यादीतील ५ हजार ४०२ यात्रेकरूंना हजला जाण्याची संधी मिळाली असून, त्यांच्यासह सर्व हज यात्रेकरूंना रक्कम व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १९ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या वर्षी हजचा मुख्य विधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होत असून, त्यासाठी २४ जुलैपासून भारतीय यात्रेकरूंना पाठविण्यात येणार आहे. देशभरातील विविध २१ विमानतळांवरून सौदी अरेबियाला विमानाची उड्डाणे करण्यात येणार आहेत.
इस्लाममधील पाच प्रमुख तत्त्वांपैकी हज यात्रा हे एक महत्त्वाचे तत्त्व असून, हज कमिटी आॅफ इंडियातर्फे त्याबाबतची प्रकिया राबविली जाते. या वर्षी कमिटीचा कोटा १ लाख २५ हजार २५ तर खासगी टूर्स कंपनीसाठी ४५ हजार जणांचा कोटा आरक्षित करण्यात आला आहे. सौदी अरेबियाकडून त्यासाठी ग्रीन व अझिझा या गटासाठी आकारल्या जाणाऱ्या रियालची (सौदी चलन) निश्चिती नुकतीच करण्यात आली असून, हज कमिटीने त्यानुसार दोन्ही गटांसाठीचे शुल्क निश्चित केले आहे. या वर्षी ग्रीन गटासाठी सरासरी २ लाख ३२,६५० रुपये तर अझिझासाठी १ लाख ९९,२५० रुपये दर आहे. प्रस्थान करावयाच्या विविध ठिकाणच्या विमानतळांपासून त्याच्या दरामध्ये २ ते ५ हजार रुपयांचा फरक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही विभागांतील शुल्क सरासरी २० हजारांनी वाढले आहे.
या वर्षीच्या कोट्यामध्ये निवड झालेल्या ५ हजार ४०२ जणांनी विविध कारणांमुळे यात्रेला जाण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी प्रतीक्षा यादीत असलेल्यांना यात्रेची संधी मिळणार आहे. त्यांनी आपले पासपोर्ट, बँक पासबुक, फोटो व शुल्क १९ जूनपर्यंत संबंधित राज्य हज समितीकडे पाठवावयाचे आहेत. त्यांच्याकडून २६ जूनपर्यंत ते केंद्रीय हज कमिटीकडे पाठविले जातील.
प्रतीक्षा यादीतील ५,४०२ अर्जदारांबरोबरच २०० महिलांची (मेहरम) निवड करण्यात आली असून, त्यांनी उपरोक्त मुदतीमध्ये पासपोर्ट, शुल्क व अन्य कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे.
वास्तव्याची सोय
या वर्षी धार्मिक विधीवेळी ‘ग्रीन’ कॅटेगिरीतील भाविकांना मदिनेतील मस्जिद-ए-नवबी (मरकजिया)मध्ये वास्तव्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची पायपीट कमी होणार आहे. त्याचबरोबर ‘अझिझा’ यात्रेकरूंना एअर कूलरची उपलब्धता केली असून, दोन वेळचे जेवण दिले जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अताऊर रहमान यांनी सांगितले.
हजसाठी कमिटीमार्फत २४ जुलै ते ३ सप्टेंबरपर्यंत यात्रेकरूंना पाठविण्यात येईल. तर परतीचा कार्यक्रम ३ सप्टेंबरपासून महिनाभर असणार आहे.
- अताऊर रहेमान,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
हज कमिटी आॅफ इंडिया

Web Title: Haj pilgrimage for Indians is 20 thousand more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.