हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशासाठी पुरोगामी एकवटले
By admin | Published: April 21, 2016 05:14 AM2016-04-21T05:14:40+5:302016-04-21T05:14:40+5:30
हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून पुरोगामी संघटना आणि व्यक्तींनी एकत्र येत ‘हाजी अली सब के लिए’ फोरमची स्थापना केली आहे.
मुंबई : हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून पुरोगामी संघटना आणि व्यक्तींनी एकत्र येत ‘हाजी अली सब के लिए’ फोरमची स्थापना केली आहे. या फोरममध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही उडी घेतली आहे. २८ एप्रिलला हाजी अली दर्ग्याबाहेर धरणे आंदोलन केले जाणार आहे.
हाजी अली दर्ग्यात २०११ सालापर्यंत महिलांना प्रवेश देण्यात येत होता. मात्र त्यानंतर ट्रस्टची कमिटी बदलली आणि महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यासाठी वेगवेगळी कारणे देण्यात आली. त्यामुळे महिलांना प्रवेश नाकारण्यामागे कोणतेही धार्मिक कारण नसल्याचा युक्तिवाद फोरमचे जावेद आनंद यांनी केला आहे. आनंद म्हणाले की, कोणत्याही धर्माला किंवा जातीला फोरमचा विरोध नाही. चुकीच्या रूढी-परंपरांना विरोध आहे. माहिमच्या मगदूम शाह बाबा दर्गामध्ये महिलांना प्रवेश दिला जात असताना हाजी अलीला प्रवेश नाकारणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही दर्गाच्या विश्वस्तपदी एकच समिती असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
त्र्यंबकेश्वरच्या घटनेचा निषेध
त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीचा तृप्ती देसाई यांनी निषेध व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, पोलिसांच्या उपस्थितीत महिलांना बेदम मारहाण होत असेल, तर गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. शिवाय कोर्टाच्या आदेशानंतरही महिलांना प्रवेश नाकारणाऱ्या मंदिराच्या ट्रस्टी या स्वत: न्यायाधीश आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना सरकारी सेवेतून पायाउतार करण्याची मागणीही त्यांनी केली. गुरूवारी या घटनेचा समाचार घेण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.