झोपडीत वाढलेल्या ‘काजल’ची राज्य हॉकीत भरारी!

By Admin | Published: December 27, 2015 01:52 AM2015-12-27T01:52:29+5:302015-12-27T01:52:29+5:30

झोपडीत राहणाऱ्या एका मुलीने देदीप्यमान यश संपादन करीत राज्याच्या हॉकी संघात स्थान मिळविले आहे. चार बहिणी-दोन भाऊ असा मोठा परिवार, मोलमजुरी करणारे आई-वडील, अत्यंत

Hajite 'Kajal' state hawkish fate! | झोपडीत वाढलेल्या ‘काजल’ची राज्य हॉकीत भरारी!

झोपडीत वाढलेल्या ‘काजल’ची राज्य हॉकीत भरारी!

googlenewsNext

- नितीन काळेल,  सातारा

झोपडीत राहणाऱ्या एका मुलीने देदीप्यमान यश संपादन करीत राज्याच्या हॉकी संघात स्थान मिळविले आहे. चार बहिणी-दोन भाऊ असा मोठा परिवार, मोलमजुरी करणारे आई-वडील, अत्यंत हलाखीची आर्थिक स्थिती, हाता-तोंडाशी गाठ पडतानाही अवघड, अशा प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत तिने हे यश मिळविले आहे.
दुष्काळी भागातील माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील काजल आटपाडकर हिचे हे यश आहे. क्रीडा प्रबोधिनी महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील हॉकी संघातून ती सध्या खेळत आहे. वरकुटे मलवडी येथून सुमारे दीड किलोमीटरवर पाटलूची वस्ती आहे. वस्तीत अगदी मोजकीच घरे आहेत. येथील सदाशिव आटपाडकर यांची ही मुलगी. घरची शेती थोडी, त्यामुळे आटपाडकर पती-पत्नी वर्षभर मजुरी करतात.
येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत काजल शिकत होती. त्या वेळी संगीता जाधव या शिक्षिकेने काजलमधील गुणवत्ता ओळखली आणि तिला स्वत:च्या घरी ठेवून घेतले. काजलला मार्गदर्शन करण्याचे काम जाधव यांच्याबरोबरच त्यांचे क्रीडाशिक्षक पती चंद्रकांत जाधव यांनी केले. त्यांचे प्रयत्न आणि काजलच्या कष्टांमुळे २०११-१२ साली तिसरीत असतानाच तिची पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीत निवड झाली. त्यानंतर काजलला औरंगाबाद येथील शाखेत पाठविण्यात आले. सध्या ती औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे.
तेथेही अथक परिश्रम करून काजलने आता क्रीडा प्रबोधिनी हॉकीच्या १४ वर्षांखालील राज्य संघात स्थान मिळविले आहे.
अनेक ठिकाणी तिने आपला चमकदार खेळ दाखविला आहे. खेळाडू म्हणून पुढे येत असताना काजलने अभ्यासाकडेही दुर्लक्ष केलेले नाही.

छत्तीसगडला जाणार खेळायला
माण तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात नावलौकिक आहे. तालुक्यातील मोही येथील ललिता बाबर आज राष्ट्रीय खेळाडू बनली आहे. तिच्याप्रमाणेच काजलही भविष्यात माण तालुक्याचे नाव उंचावेल, असा विश्वास तिच्या शिक्षकांना आहे. पुढील महिन्यात काजल छत्तीसगड येथे स्पर्धेसाठी जाणार आहे.

Web Title: Hajite 'Kajal' state hawkish fate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.