हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश!
By admin | Published: October 25, 2016 05:07 AM2016-10-25T05:07:31+5:302016-10-25T05:07:31+5:30
मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश देण्यात येईल, असे दर्गा ट्रस्टने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्यामुळे आता महिला या दर्ग्यात
नवी दिल्ली : मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश देण्यात येईल, असे दर्गा ट्रस्टने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्यामुळे आता महिला या दर्ग्यात आतही प्रवेश करू शकतील. या दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी महिलांनी आंदोलन केले होते.
महिलांना दर्ग्यात प्रवेशाची मुभा देण्यात येईल. तथापि, त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग बनवावा लागणार असल्यामुळे ४ आठवड्यांचा अवधी देण्यात यावा, अशी विनंती ट्रस्टने न्यायालयाला केली. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, एल. नागेश्वर राव आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही विनंती मान्य करून ट्रस्टचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्धचे अपील निकाली काढले. महिलांना दर्ग्यात प्रवेशास असलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने आॅगस्टमध्ये बेकायदा ठरवून पुरुषांप्रमाणे महिलांनाही दर्ग्यात प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. ट्रस्टने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ट्रस्टच्या आव्हान याचिकेवरील यापूर्वीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ट्रस्ट महिलांच्या दर्गा प्रवेशाबाबत पुरोगामी पाऊल उचलेल, असा विश्वास व्यक्त केला होता. महिला आणि पुरुषांना एका मर्यादेपर्यंत आत जाऊ दिले तर आक्षेप नाही. तथापि, एकाला जाऊ देणे आणि दुसऱ्याला मज्जाव करणे ठीक नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ट्रस्टने दिले नवे शपथपत्र
आपण दर्ग्यात महिलांना प्रवेश देऊ इच्छितो, असे शपथपत्र हाजी अली दर्गा ट्रस्टने सादर केल्याचे वरिष्ठ विधिज्ञ गोपाल सुब्रमण्यम यांनी सांगितले. महिलांना प्रवेश न देण्यास आव्हान देणाऱ्या महिला संघटनेच्या विधिज्ञांनीही न्यायालयात म्हणणे मांडले. २०११ पूर्वीची परिस्थिती आजच्याहून भिन्न होती, असे त्यांनी न्यायालयात सांगितले.