अर्धा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत

By admin | Published: October 20, 2015 03:04 AM2015-10-20T03:04:08+5:302015-10-20T03:04:08+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बारामतीच्या विकासाचे तोंडभरून कौतुक केले असले तरीही बड्या राजकीय नेत्यांना बारामती तालुक्यातील विकासाची

Half of Baramati taluka still in drought-hit area | अर्धा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत

अर्धा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत

Next

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बारामतीच्या विकासाचे तोंडभरून कौतुक केले असले तरीही बड्या राजकीय नेत्यांना बारामती तालुक्यातील विकासाची एकच बाजू दाखवली जाते. आजही अर्धी बारामती ‘दुष्काळाच्या छायेत’ आहे. जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील ४३ गावांना आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती दाखवायची कुणी आणि संपूर्ण बारामतीचा विकास होणार कधी, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
मागील ४०-४५ वर्षे बारामतीवर एकहाती सत्ता आहे. बारामतीकरांच्या पाठिंब्यावर केंद्र व राज्यात अनेक मंत्रिपदे मिळविली. परंतु, संपूर्ण बारामतीचा विकास झाला का, हा प्रश्न जसा आहे तसाच आहे. लोकसभा, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर काही महिन्यांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बारामतीमध्ये आवर्जून हजेरी लावली. मात्र, या दोन्ही नेत्यांना बारामतीचे एकच अंग दाखविले. वस्तुस्थिती मात्र निराळीच आहे. अर्ध्याहून अधिक तालुका पाण्यापासून अद्याप वंचित आहे. कोसभरावर असलेल्या पाण्याचा स्रोत बाजूला ठेवून पुरंदर उपसा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, निवडणुकीपूर्वीच तलाव भरण्याचे नाटक केले. जनाई शिरसाई योजनेद्वारे दुष्काळी गावे पूर्ण सिंचनाखाली आली नाहीत. आज काही प्रमाणात परतीच्या पावसाने या योजनेच्या लाभक्षेत्रात असलेल्या गावांना तारले आहे. तेही जलयुक्त शिवार योजना, ओढा, नाले खोलीकरण योजनेच्या कामानंतर पाणी अडल्यामुळे. वर्षानुवर्षे या भागातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. ही वस्तुस्थिती दाखविली जात नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडूनदेखील व्यक्त केली जात आहे.
आता भाजपा नेत्यांचे आकर्षण का?
एकेकाळचे कट्टर पवारसमर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी सभापती अविनाश गोफणे यांनी सांगितले की, काँग्रेसबरोबर सत्तेत असताना भाजपा व त्या पक्षाचे नेते जातीयवादी वाटत होते.
फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन सत्तेवर राहिले. मुंबई,
दिल्लीच्या नेत्यांना बारामतीचे खरे रूप दाखविले जात नाही.
हिवरेबाजार सारखे बारामतीत एक तरी आदर्श गाव झाले आहे का, वातानुकूलित सभागृहांमध्ये नेत्यांना फक्त त्यांच्या संस्थांच्या पातळीवर केलेल्या कामाची माहिती दिली जाते. सरकारी अनुदानावरच बांधलेल्या इमारती दाखविल्या जातात, ही वस्तुस्थिती आहे.
मागील ४० वर्षांत बारामती तालुक्यातील जनतेने घाम गाळून बारामतीच्या नेत्यांना मोठे केले. परंतु, तालुक्यातील अर्ध्या भागाचा दुष्काळ हटवता आला नाही.
राजकीय सोयीनुसार विचार केला जातो. १९६७पासून ज्या स्थानिक कार्यकर्त्यांमुळे राजकीय पदे मिळाली, त्या सहकाऱ्यांसमवेत नेत्यांबरोबर स्नेहभोजन, वनभोजन का घेतले जात नाही? हा समतेचा न्याय
नाही. ज्यांच्याबरोबर अनेक वर्षे मंत्री म्हणून सत्ता भोगली, त्या माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांना कधी बारामतीला बोलावले नाही. आता भाजपा नेत्यांचेच आकर्षण का, असा सवाल त्यांनी केला आहे.

पवारांची जुनी रणनीती...
बारामतीची वस्तुस्थिती जगापुढे येऊ नये, याची काळजी आतापर्यंत घेतली गेली आहे. पाण्याच्या प्रश्नावर मागील ५-६ वर्षांपासून तालुक्यातील जनता आक्रमक आहे. अगदी काळ्या गुढ्या उभारून या प्रश्नी लोकांनी लक्ष वेधले होते. अंध शेतकऱ्यांनी उपोषण केले. मागील १५ वर्षे केंद्र व राज्यात शरद पवार, अजित पवार सत्तेवर होते. या काळात तरी तालुक्याचा कायापालट करणे आवश्यक होते. आज जिरायती भागातील तरुण स्थलांतरित होत आहेत. निवडणुकीपूर्वी पुरंदर उपसा योजनेचे पाणी आणण्याचे गाजर दाखविले. जलपूजन केले. पुढे काय....? हक्काची पिके घेता आली नाहीत, खरीप गेला, रब्बी जाण्याच्या मार्गावर आहे. पाण्याअभावी जनता होरपळली आहे. पावसाच्या आडलेल्या पाण्यावर थोडीफार पिके तरणार आहेत. ब्रिटिशकालीन पैसेवारीच्या पद्धतीला स्वीकारले असल्यामुळे या गावांचा दुष्काळी म्हणून देखील समावेश झाला नाही, ही येथील नेत्यांची नामुष्की आहे.

आजही ५ टँकरने होतो पाणीपुरवठा
परतीच्या पावसाने ओढे, नाल्यांच्या खोलीकरण योजनेमुळे पाणी साठले. दुष्काळी गावांच्या मदतीला निसर्गच आला. पाणी आडविण्याचे केलेल्या कामामुळे पाणी आडले. परंतु, आजही ५ गावे, ३२ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा जवळपास १२ हजार नागरिकांना केला जातो. त्यामध्ये सुपे परगण्यातील कारखेल, काळखैरेवाडी, शेरेवाडी, देऊळगाव रसाळ, पानसरेवाडी यांचा समावेश आहे. काही गावांना मागील दिवाळीपूर्वी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला, तो आजही आहे, असे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले.

खरी बारामती दाखवलीच जात नाही...
राजकारणात सर्वपक्षीय नेत्यांबरोबर मैत्रीचे संबंध असतात. मात्र, त्याचा खुबीने वापर बारामतीच्या नेत्यांकडून केला जातो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवारांना मिळालेली मते या नेत्यांना विचार करायला लावणारी ठरली आहेत. त्यामुळे भविष्यात राजकीय धु्रवीकरण होऊ नये. भाजपाच्या मोठ्या नेत्यांना त्यांच्या संस्थांच्या कार्यक्रमांना बोलवून संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. खरी बारामती दाखवलीच जात नाही, अशी खरमरीत टीका भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी केली.

सकारात्मक विचाराने बघा...
विविध संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती, शेतकरी, शेतमजुरांसाठी शेतीविषयक मार्गदर्शन, शिक्षणाच्या सोयी केल्या जात असल्यामुळे बारामतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. दुष्काळी गावांना कायम पाण्याचा स्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे विरोधकांना टीका करण्याची सवय झाली आहे. परंतु, शैक्षणिक विकासामुळे तरुणांना मिळालेल्या संधींची माहिती त्यांच्याकडून दिली जात नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले.

Web Title: Half of Baramati taluka still in drought-hit area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.