राष्ट्रवादीत अर्धा डझन वंजारी उमेदवार; पृथ्वीराज साठेंसाठी धनंजय मुंडेंची समाजाला साद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:30 PM2019-10-18T12:30:17+5:302019-10-18T12:31:00+5:30
जी लोक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना नको होती, त्यांना आमच्या ताईंनी भाजपमध्ये प्रवेश दिला. परंतु,या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचे एकमेव कारण असून ताईंना परळीची लढत सोपी व्हावी, यासाठी उठाठेव सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहचला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून आणि नेत्यांकडून प्रलोभणे देण्यात येत आहेत. तर अनेक नेते विकासाच्या मुद्दावर मत मागताना दिसत आहेत.परंतु, बीडच्या राजकारणात नेहमीच जातीच्या राजकारणाला महत्त्व असते. वंजारी समाज पंकजा मुंडे यांची व्होटबँक असं जणू समीकरणच आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या झंझावाताने वंजारी मतदान काही प्रमाणात राष्ट्रवादीच्या खात्यात जमा होत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केजचे राष्ट्रवादीचे उमेदवार पृथ्वारीजा साठे यांच्यासाठी आयोजित सभेत वंजारी समाजासाठी राष्ट्रवादी पक्ष किंती चांगला आहे, याविषयी माहिती दिली.
धनंजय मुंडे यांनी केज मतदारसंघात आयोजित सभेत पृथ्वीराज साठे यांना आशीर्वाद देण्याची विनंती मतदारांना केली. या मतदार संघात 80 हजारहून अधिक वंजारी मतदान आहे. या मतदारांकडून नेहमीच भाजपला झुकतं माप देण्यात येते. यावेळी मात्र धनंजय मुंडे यांनी वंजारी मतांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
बीड जिल्ह्यातील परळी सोडल्यास, सर्वच मतदार संघात वंजारी मतांची जुळवाजुळव उमेदवारांकडून सुरू असते. केजमधून पृथ्वीराज साठे आणि नमिता मुंदडा रिंगणात आहेत. साठे यांच्यासाठी आयोजित सभेत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून वंजारी समाजातील सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याचे नमूद केले. तर भाजपकडून केवळ एक वंजारी उमेदवार देण्यात येतो. भाजपकडून समाजाला केवळ गृहित धरण्यात येते, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी मुंडे यांनी राष्ट्रवादीतील सहाच्या सहा उमेदवारांची नावे व्यासपीठावर सांगितली.
यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर जोरदार टीका केली. जी लोक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना नको होती, त्यांना आमच्या ताईंनी भाजपमध्ये प्रवेश दिला. परंतु,या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचे एकमेव कारण असून ताईंना परळीची लढत सोपी व्हावी, यासाठी उठाठेव सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.