गुंतवणुकीचे निम्मे ‘मेक इन’ राज्यात!
By Admin | Published: February 19, 2016 03:49 AM2016-02-19T03:49:01+5:302016-02-19T03:49:01+5:30
भारतात तब्बल १५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले असून त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ७ लाख ९४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होणार आहे.
मुंबई : मेक इन इंडिया सप्ताहात देशविदेशातील उद्योगांनी भारतात तब्बल १५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले असून त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ७ लाख ९४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होणार आहे. त्याद्वारे तब्बल ३० लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
१३ फेब्रुवारीपासून बीकेसी मैदानावर सुरू असलेल्या या सप्ताहाचे आज सूप वाजले. गुंतवणुकीच्या आघाडीवर त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. या सप्ताहात राज्यातील गुंतवणुकीसाठी झालेल्या करारांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन विशेष टास्क फोर्सची स्थापना करेल, असे मुख्यमंत्र्यांनी समारोपानंतर सांगितले. या गुंतवणुकीचा आढावा राज्य प्रशासन दर महिन्याला घेईल, असे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जाहीर केले. सप्ताहाचा समारोप झाला असला तरी महाराष्ट्राच्या दृष्टीने आजपासून मेक इन इंडिया अन् महाराष्ट्रचे मिशन सुरू झाले.
या सप्ताहानिमित्त राज्याराज्यांमध्ये निकोप स्पर्धा दिसली. देशाची आणि महाराष्ट्राची ताकद जगाला दिसली, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाचे सचिव अमिताभ कांत, केंद्रीय सचिव रमेश अभिषेक आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
मराठवाडा, विदर्भात १.५० लाख कोटी
औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाडा व विदर्भ विभागात
१ लाख ५० हजार कोटी रु पयांच्या गुंतवणुकीचे करार झाले.
खान्देशात २५ हजार कोटी रु पये, पुणे विभागात ५० हजार कोटी, तर मुंबईसह कोकण विभागात ३ लाख २५ हजार कोटी
रुपयांची गुंतवणूक झाली आहे. उर्वरित विभागवार गुंतवणुकीची आकडेवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे.