मानेवरील अर्ध्या किलोची गाठ काढली
By Admin | Published: May 12, 2017 02:05 AM2017-05-12T02:05:11+5:302017-05-12T02:05:11+5:30
गेल्या पाच वर्षांपासून मानेला गाठ घेऊन जगणाऱ्या मराठवाड्यातील तरुणीवर जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून मानेला गाठ घेऊन जगणाऱ्या मराठवाड्यातील तरुणीवर जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी या गाठीला चिकटलेली असल्याने शस्त्रक्रिया करणे खूपच अवघड होते. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला होता; पण हे आव्हान स्वीकारून या तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकण्यात जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे.
ही गाठ १३ सेंटिमीटर असून तिचे वजन अर्धा किलो होते.
जे. जे. रुग्णालयाच्या डॉ. रजत कपूर यांनी ही गाठ काढली. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील रूपाली पवार (१६) असे या तरुणीचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या गळ्याला उजव्या बाजूला एक लहानशी गाठ आली होती. गळ्याला असलेली ही गाठ वाढत जात होती, यामुळे कोणीही डॉक्टर उपचार करण्यासाठी तयार होत नव्हता.
सर्व डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, आईवडिलांनी तिला मागील वर्षी जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्या वेळी या रुग्णालयातील डॉक्टरांनी विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. या चाचणी अहवालात गळ्याला असलेली गाठ ही मेंदूच्या रक्तवाहिनीला जोडलेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे कठीण होते; पण कुटुंबीयांची समजूत काढून डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करून गाठ काढली, असे रूपालीच्या पालकांनी सांगितले.
अवघड शस्त्रक्रिया रक्तस्रावाचा होता धोका-
वर्षभरापूर्वी या मुलीला तिच्या आईवडिलांनी उपचारासाठी रुग्णालयात आणले होते. तिच्या गळ्याच्या उजव्या बाजूला ही गाठ होती. तपासणीदरम्यान ही गाठ मेंदूच्या रक्तवाहिनीला चिकटलेली असल्याचे निदान झाले. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे अवघड होते. कारण, हलकासा धक्का जरी लागला असता तर रक्तस्राव होण्याची शक्यता होती; पण तरीही ही शस्त्रक्रिया करण्याचे आम्ही ठरवले. ही मोठी शस्त्रक्रिया करून आम्ही गाठ काढण्यात यशस्वी झालो.
- डॉ. रजत कपूर, प्राध्यापक व प्लास्टिक सर्जरी विभाग कक्षप्रमुख, जे. जे. रुग्णालय