दीड कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त :राज्य उत्पादन शुल्क
By admin | Published: April 1, 2017 08:55 PM2017-04-01T20:55:20+5:302017-04-01T20:55:20+5:30
रिक्त पदांची संख्या अधिक असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने याहीवर्षी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई
नाशिक : रिक्त पदांची संख्या अधिक असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने याहीवर्षी मोठ्या प्रमाणात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली असून, २ हजार २१९ गुन्हे नोंदवत एक हजार २८२ आरोपींना अटक करून १ कोटी ५३ लाख ४६ हजार ८७६ रुपयांचा अवैध मद्यसाठा पकडला आहे़ याबरोबरच अवैध मद्याची वाहतूक करणारी ५७ वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश असल्याची माहिती अधीक्षक आऱजी़ आवळ यांनी दिली आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून दारू उत्पादनावर लक्ष ठेवणे व बेकायदा दारू विक्री, वाहतूक, बनावट मद्यनिर्मिती रोखण्याची तसेच कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे; मात्र या विभागाकडे कारवाई करण्यासाठी पुरेसे कर्मचारी व वाहनांची कमतरता आहे़; मात्र याही परिस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जोरदार कारवाई सुरू आहे़
उत्पादन शुल्क विभागातील उपअधीक्षक पी़ एऩ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षी महसुलात वाढ होत आहे़ उत्पादन शुल्क विभागाने २०१६-१७ या आर्थिक वर्षात बनावट विदेशी मद्य आणि हातभट्टी दारू उत्पादन प्रकरणी आतापर्यंत २ हजार २१९ गुन्हे दाखल करून १ हजार २८२ आरोपींवर गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे़ यापैकी एक हजार २३९ गुन्ह्यांमध्ये आरोपी सापडले असून, ९८० गुन्ह्यांमध्ये आरोपी सापडलेले नाहीत़
गतवर्षात अर्थात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत २ हजार १५० गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यापैकी ९९८ गुन्हे बेवारस आहेत. १ हजार १५२ वारस गुन्ह्यांमध्ये म्हणजे ज्या छाप्याच्या कारवाईत आरोपी सापडले तेथून १ हजार १५६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यावर्षात १ कोटी ३२ लाख ६ हजार २५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ तर २०१६ -२०१७ मध्ये १ कोटी ५३ लाख ४६ हजार ८७६ रुपयांचा अवैध मद्यसाठा पकडला आहे़