मुंबईतील निम्मे पोलीस अद्याप वेतनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: March 9, 2016 05:48 AM2016-03-09T05:48:30+5:302016-03-09T05:48:30+5:30
आर्थिक वर्षअखेरीमुळे गुंतवणूक व खर्चाच्या रक्कमेची सांगड घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे मुंबईकरांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले मुंबई पोलीस दलातील निम्म्याहून अधिक
मुंबई: आर्थिक वर्षअखेरीमुळे गुंतवणूक व खर्चाच्या रक्कमेची सांगड घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे मुंबईकरांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले मुंबई पोलीस दलातील निम्म्याहून अधिक पोलीस अधिकारी-कर्र्मचारी वेतनाविना आहेत. मार्च महिन्याच्या पहिला आठवडा उलटूनही पगार न झाल्याने पोलिसांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महागाई भत्ता व अन्य भत्त्यांची तसेच फरकाची रक्कम वेतनामध्ये समाविष्ट करण्याचे काम पूर्ण न झाल्याने वेतन होण्यास विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
समाजात कायदा व सुव्यवस्था कायम होण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला कोणत्याही परिस्थितीत पगार वितरित करण्यात यावा, असे आदेश तीन वर्षांपूर्वी कॉँग्रेस आघाडी सरकारने गृह विभागाला बजाविले होते. मात्र ते आदेश केवळ कागदावरच आहेत. अतिरेक्याचे लक्ष्य असलेल्या मुंबईत ५० हजारांवर फौजफाटा कार्यरत आहे. त्यापैकी निम्म्या पोलिसांना मार्च महिन्याचे वेतन अदा करण्यात आले आहे. विविध प्रादेशिक विभाग व शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र अद्याप प्रलंबित आहे. मार्च महिन्यामुळे विविध प्रकारची कर्ज, तसेच ‘पॉलिसी’ व गुंतवणुकीच्या योजनांमध्ये पैसे भरण्याची धांदल सुरु असताना पगार न झाल्याने पोलिसांमध्ये नाराजी आहे. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी महागाई, गणवेष व अन्य भत्त्यांचा समावेश वेतनात करावयाचा आहे. त्याच्या हिशेब करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे काहींच्या पगाराला विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)