राज्यातील निम्म्या पोलीस ठाण्यांत महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, स्वच्छतागृहांचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 06:03 AM2019-12-25T06:03:24+5:302019-12-25T06:03:45+5:30
पुरुष टॉयलेटचा वापर करण्याची नामुष्की; पोलीस महासंचालकांनी मागविलेल्या अहवालातून उघड
जमीर काझी
मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असलेल्या महिला पोलिसांसाठी मात्र स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि विश्रांती कक्षांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. राज्यातील पोलीस ठाण्याच्या जवळपास निम्म्या ठिकाणी त्यांच्यासाठी ‘रेस्ट रूम’ नसून १६३ पोलीस ठाण्यात त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. त्या ठिकाणी पुरुषांसाठीच्या स्वच्छतागृहांचा वापर त्यांना करावा लागत आहे.
पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी राज्यभरातून मागविलेल्या अहवालातून ही विदारक सद्यस्थिती समोर आली आहे. स्वतंत्र टॉयलेट नसल्याने महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या बिरुदावलीने कार्यरत महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाख १० हजारांहून अधिक पोलीस कार्यरत आहेत. त्यामध्ये महिलांची संख्या ३० हजारांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. त्यामध्ये कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारापर्यंतच्या महिलांची संख्या २८ हजारांहून अधिक आहे. राज्य सरकारने भरतीमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवल्याने गेल्या ६, ७ वर्षांत तरुणींची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र त्या तुलनेत त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा, साधनांची कमतरता मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात तेथील कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व विश्रांती कक्ष असतात, तसेच महिला अधिकारी व कर्मचाºयांसाठीही स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र अनेक पोलीस ठाण्यात याची कमतरता आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालय वगळता उर्वरित राज्यातील एकूण ४६ पोलीस घटकांमध्ये एकूण १०१० पोलीस ठाणी आहेत. त्यामध्ये ८३७ ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत, तर ५७१ विश्रांती कक्षांची उपलब्धता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांना आवश्यकतेसाठी पोलीस ठाण्याशिवाय परिसरातील सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या खासगी स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे. विश्रांतीसाठी स्वतंत्र कक्ष नसल्याने कंटाळा आला तरी पोलीस ठाण्यात सर्वांसमोरच बसून राहावे लागत आहे.
‘त्या’ दिवसांमध्ये ‘प्रायव्हसी’चा अभाव
अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मंत्र्यांचे दौरे, त्यांच्या सभा, रॅली, निवडणुका आदी कारणास्तव बंदोबस्तानिमित्त पोलिसांना एका ठिकाणी तासन् तास उभे राहावे लागते. त्यापैकी बहुतांश ठिकाणी महिलाच नव्हे तर पुरुष कॉन्स्टेबलसाठीही स्वच्छतागृहे नसतात. त्या ठिकाणाहून परत पोलीस ठाण्यात आल्यानंतरही महिलांना क्षणभरही ‘प्रायव्हसी’ मिळत नाही. त्यामुळे मासिक पाळीच्या कालावधीत मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मुंबई वगळता राज्यातील १०१० पोलीस ठाण्यांपैकी ४३९ ठिकाणी विश्रांती कक्ष नाहीत, तसेच १६३ पोलीस ठाण्यात त्यांना पुरुष स्वच्छतागृहांचा वापर करावा लागतो.
आर्थिक राजधानीतही महिला पोलिसांची गैरसोय
च्राज्यातील अन्य पोलीस घटकांप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्तालयातही महिला पोलिसांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि विश्रांती कक्षांची कमतरता आहे. विशेष म्हणजे त्याबाबतची नेमकी आकडेवारी पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते असलेल्या उपायुक्त (अभियान) प्रणय अशोक यांच्याकडे उपलब्ध नव्हती.
च्३९ पोलीस ठाणे व एक सायबर अशा सर्व ९४ पोलीस ठाण्यात लेडीज टॉयलेट आहेत, मात्र महिला अधिकारी व अंमलदारांसाठी किती स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत, तसेच त्यांच्या विश्रांती कक्षांची माहिती त्यांच्याकडे नव्हती. उपायुक्त प्रणय अशोक व वार्ताहर कक्षातील सहायक निरीक्षक समाधान चौधरी यांनी सर्व पोलीस ठाण्यात लेडीज टॉयलेट आहेत, असे मोघमपणे सांगितले.