जूनमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस
By admin | Published: June 29, 2016 08:38 PM2016-06-29T20:38:41+5:302016-06-29T20:38:41+5:30
या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे भात वगळता खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
ऑनलाइल लोकमत
पुणे, दि. २९ : या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे भात वगळता खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. जून महिन्यात १४२.४० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, या वर्षी आजपर्यंत फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे.
हवामान विभागाने वेळोवेळी वर्तवलेल्या आंदाजानुसार चांगला पाऊस या वर्षी पडेल, असे सांगितले गेले. यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. कृषी विभागानेही तयारी करून तालुक्यानुसार बैैठका घेऊन नियोजन सांगितले. मात्र, गेला महिनाभर पाऊस हुलकावणीच देत आहे. सुरुवातीला भात उत्पादकांनी धूळवाफेवर काही ठिकाणी पेरण्या केल्या. मात्र, पाऊसच येत नसल्याने त्या वाया जातात की काय, असा पेच निर्माण झाला होता. पण, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काहीसा पाऊस झाल्याने त्या पेरण्या वाचल्या. मात्र, पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी पेरण्या कराव्या की नाही, अशा विवंचनेत सापडला आहे.
कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जूनपासून २८ जूनपर्यंत फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस जिल्ह्यात झाला आहे. गेल्या वर्षी तो २२७.२१ मिलिमीटर झाला होता. त्यामुळे सुरुवातीलाच पावसाला निम्मी सरासरी गाठता आली नसल्याने चिंता निर्माण झाली आहे.
आतापर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिमी)
आंबेगाव : ३६.९०
बारामती : ९६.८०
भोर : ६६.२०
दौैंड : ८८.१०
हवेली : २७.१०
इंदापूर : १५७.७०
जुन्नर : ५९.४०
खेड : ९४.६०
मावळ : १०५.३०
मुळशी : १०८.६०
पुरंदर : ३३.८०
शिरूर : ४२.७०
वेल्हा : १०८.७०
फक्त ४.३७ टक्के पेरण्या
पाऊस हुलकावणी देत असल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, आतापर्यंत उसासह फक्त ४.३७ टक्के इतक्यात क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक सोयाबीनच्या ३३.६ टक्के इतक्या पेरण्या झाल्या असून, त्याखालोखाल मुगाच्या ३२.४ टक्के, मका १५.७, बाजरी १०.६, भात ४.८, ज्वारी २.९,उडीद ९.०, भुईमूग ३.६ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत.
भात ४.८ टक्के
खरीप हंगामात भात हे पीक सर्वाधिक सुमारे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. या वर्षीच्या नियोजनात ५५ हजार हेक्टरवर ते घेण्याचे ठरविले होते. जून महिन्यात भाताचा जवळपास १०० टक्के क्षेत्रावर पेरण्या होतात; मात्र या वर्षी सरासरीच्या फक्त ७२९.५ हेक्टरवरच पेरण्या झाल्या असून, ती टक्केवारी ४.८ इतकीच आहे. पावसाची कृपा झाली नाही, तर यंदा भात उत्पादकांवरही संकट येण्याची शक्यता आहे